सितम सोनवणे , लातूररेणापूर पंचायत समितीअंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून, त्यासंबंधी काम करणाऱ्या १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी ठपका ठेवून त्यांच्याकडून निलंबन निधी निश्चित केला होता. पण यावर जिल्हा परिषदेने कसलीच कारवाई केली नसल्याने सर्वसाधारण बैठकीतून जि.प. सदस्यांनी सभात्याग केल्याने जिल्हा परिषदेने याची दखल घेऊन संबंधित १६ अधिकाऱ्यांंना नोटिसा बजावल्या होत्या. यातील केवळ सहा अधिकाऱ्यांनीच खुलासे सादर केले. तर अद्यापही १० जणांनी खुलासे सादर केले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेने त्यांना स्मरणपत्र पाठविले आहे. कामात अनियमितता आढळून आल्याने या कामाबद्दलचा निलंबन निधी निश्चित केला होता. संबंधित अधिकाऱ्यांकडून तो वसूल करावा, अशा आशयाचे पत्र जिल्हा प्रशासनाने जि.प.ला पाठविले होते. मात्र हे पत्र जुजबी कारवाई करून दोन वर्षे दडवून ठेवले होते. तीन अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावीत केली होती. यामुळे जि.प.च्या सर्वसाधारण सभेतही गदारोळ झाल्याने १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविल्या होत्या. परंतु, संबंधितांनी नोटिशीचे उत्तर दिले नाही. केवळ सहा जणांनीच उत्तर दिले आहे. त्यामुळे आता जि.प. प्रशासनाने दहा जणांना स्मरणपत्र पाठविले आहेत.
रोहयो प्रकरणी १० जणांना स्मरणपत्र
By admin | Updated: September 10, 2015 00:31 IST