उस्मानाबाद : सध्या शाळांना सुट्या सुरू असून, याचाच फायदा घेत दररोजचे कामाचे टेन्शन आणि कुटुंबातील अंतर्गत कलह यातून थोडेसे दूर जावून निसर्गरम्य ठिकाणी सहकुटुंब दोन-चार दिवस घालावेत, या उद्देशाने शहरातील बहुतांश नागरिक पर्यटनाचा पर्याय निवडत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने काही नागरिकांशी थेट संवाद साधून सर्वेक्षण केले असता नोकरदार आणि व्यापारीही वर्षातून किमान दोन-तीन वेळा सहकुटुंब पर्यटनाला जात असल्याचे समोर आले. त्यातल्या त्यात हे लोक पर्यटनासाठी म्हणून धार्मिक स्थळांना अधिक पसंती असून, पर्यटन कंपन्यांपेक्षा समुहाने पर्यटनाला जाण्यासच बहुतांश लोकांनी पसंती दिली. वर्षभर नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शाळा यातून पर्यटनाला जाण्यासाठी वेळ काढणार्यांची संख्या सुमारे ८० टक्के असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले. यातील ६५ टक्के लोकांनी कधीकधी तर २५ टक्के लोकांनी दरवर्षी किमान दोन-तीन वेळा जात असल्याचे सांगितले. दहा टक्क़े लोक मात्र कधीही आवर्जुन पर्यटनाला जात नसल्याचे सांगितले. यातही मित्र-मैत्रिणी अथवा वैयक्तीक जाण्यापेक्षा सहकुटुंब जाणार्यांची संख्या जास्त आहे. साठ टक्के लोक हे सहकुटुंब पर्यटनाला जात असून, मित्रमैत्रिणी आणि वैयक्तीक जाणार्यांची संख्या प्रत्येकी वीस टक्के असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. उस्मानाबाद हे नोकरदारांचे शहर आहे. शिवाय मुलांच्या शाळा, क्लासेस यांचा विचार करून नागरिकांना साप्ताहीक सुटीला लागून येणार्या इतर सुट्या गाठून पर्यटनाला जाण्याची तयारी करावी लागते. शहराच्या जवळपास तशी फारशी पर्यटनस्थळे नाहीत. त्यामुळे नागरिकांना किमान दोन ते तीन दिवसांच्याच टूरचे प्लॅनिंग करावे लागते. शहरातील सुमारे सत्तर टक्के लोक अशा दोन-तीन दिवसांच्या टूर अॅरेंज करीत असून, केवळ वीस टक्केच लोक आठवडा व त्याहून अधिक दिवस पर्यटनासाठी जातात. त्यातही व्यापारी वर्गाचा अधिक सहभाग राहतो. दहा टक्क़े नागरिक दोन-चार महिन्यातून एखादा दिवस कुटुंबासोबत पर्यटनाचा आनंद घेत असल्याचेही समोर आले आहे. कामाच्या ताणातून वेळ काढून मार्इंड फ्रेश करण्याचा हा नवा फंडा प्रत्येकालाच उपयुक्त ठरत आहे. बाहेरगावी जाऊन आल्यानंतर काम करताना मिळणारी शक्ती कित्येक दिवस साथ देत असल्याने पर्यटनाला जाणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. वास्तविक नोकरदारांना स्वत:च्या व मुलांच्या शाळांच्या सुट्या विचारात घेऊन पर्यटनाचे प्लॅनिंग करावे लागते. त्याच प्रमाणे व्यापारीवर्गही ‘सिझन’ विचारात घेऊनच हे प्लॅनिंग करतात. यातही बहुतांश लोक सहकुटुंब धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जाण्यालाच अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे आठवडाभर किंवा त्याहून अधिक काळ पर्यटन करणार्यांमध्ये व्यापार्यांचा अधिक समावेश दिसून येतो.
धार्मिक स्थळांना अधिक पसंती
By admin | Updated: May 24, 2014 01:42 IST