वडोदबाजार : मुंबईतून भरकटलेल्या १३ वर्षीय गतिमंद मुलाला वडोदबाजार पोलिसांनी आधार देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे़ या मुलाला पोलिसांनी केवळ आधारच दिला नाही, तर त्याला नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला़ पोलिसांनी सांगितले की, हा मुलगा वाहेगाव (ता़ फुलंब्री) येथे बुधवारी रात्री अत्यंत दयनीय अवस्थेत दिसून आला. किशोर फकीरराव मानकर (१३, रा. गोसावी पांगरी, ता. परतूर, जि.जालना) असे त्याचे नाव आहे़ दुष्काळामुळे गावात काम नसल्याने मानकर कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई येथे स्थलांतरित झाले आहे. आई-वडील मजुरी कामानिमित्त मुंबईला गेल्याने तोही त्यांच्यासोबत गेला; परंतु तो तेथून अचानक भरकटला़ तो बुधवारी रात्री १०.३० वाजेदरम्यान वाहेगाव येथे गावात फिरताना काही नागरिकांना दिसून आला़ याबद्दल एका इसमाने पोलिसांना माहिती दिली़ यानंतर त्वरित वडोदबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मुलाला ठाण्यात आणले़ तेथे त्याला जेवण दिल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली़यानंतर पोलिसांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता सदर मुलगा गतिमंद असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी काही वेळाने बोलते करून नाव, गावाची विचारणा केली़ यादरम्यान पोलिसांनी कंट्रोल रूमला याबाबत माहिती कळवून जालना पोलिसांशी संपर्क साधला. परतूर पोलीस ठाण्यात एका जमादाराने गोसावी पांगरी गावात जाऊन या मुलाबाबत विचारपूस केली तेव्हा तो तेथीलच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर भरकटलेल्या किशोरला पोलिसांनी नातेवाईकाकडे सुपूर्द केले़ यासाठी स़पो़नि़ नरहरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. दिलीप साळवे,जनार्दन राठोड, शरद साळवे, इब्राहीम पठाण, अशोक तोरडमल, अजीज शेख, भाऊसाहेब इधाटे, सोमीनाथ रसाळ, परमेश्वर घुगे, फरकाडे आदींनी सहभाग घेतला़
मुंबईतून भरकटलेला मुलगा नातेवाईकांच्या स्वाधीन
By admin | Updated: April 16, 2016 01:45 IST