बीड : शंहेशाहनगर भागात निवृत्त नायब तहसीलदाराच्या पत्नीच्या खुनाचा आरोप असलेल्या नातू व सुनेचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे आरोपींच्या अडचणीत भर पडली आहे.शहरातील शंहेशाहनगर भागात निवृत्त नायब तहसीलदार शेख इमाम यांच्या पत्नी बद्रूनिसा सून रजिया बेगम व नातू शेख जुबेर यांच्यासमवेत राहत होत्या. शेख इमाम यांचे २०११ मध्ये निधन झाले. पत्नी रजियासोबत पटत नसल्याने शेख एजाज हे दहा वर्षांपासून मुंबईला वास्तव्यास आहेत. दरम्यान, २० फेबु्रवारी २०१३ रोजी बद्रूनिसा मृत्यूमुखी पडल्या. त्यांचा पत्नी रजिया व मुलगा जुबेर यांनी खून केल्याची तक्रार शेख एजाज यांनी केली होती. उत्तरीय तपासणी न करता दफनविधी उरकला असा आक्षेपही त्यांनी घेतला होता. न्यायालयाच्या आदेशावरुन शहर ठाण्यात २० एप्रिल २०१६ रोजी रजिया बेगम व शेख जुबेर या माता- पुत्रावर खुनाचा गुन्हा नोंद झाला. या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. अतिरिक्त सत्र न्या. एस. आर. कदम यांनी त्यांना अटकपूर्व जामीन नाकारला. (प्रतिनिधी)
वृद्धेच्या खूनप्र्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला
By admin | Updated: July 31, 2016 01:15 IST