हिंगोली : जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अनेक बरे-वाईट नमुने समोर आले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची नियमित तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयसक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरुण बनसोडे यांनी दिली.या एकंदर प्रकाराबाबत काही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर डॉक्टर हजर राहात नसल्याच्या तक्रारी आल्यास त्याच्या तपासणीसाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाला तसा प्रकार आढळला तर डॉक्टरवर वेतनवाढ कमी करण्यासह इतर दंडात्मक पद्धतीची कारवाई करण्यात येईल. हाच नियम आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहे. जिल्ह्यात आॅपरेशन कायापालटचे निकष पूर्ण करतील, अशा पद्धतीने सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सोयीसुविधा व उपचार राहतील, याकडे लक्ष दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी पाहणीही सुरू आहे.काही ठिकाणी रिक्त पदांची अडचण असली तरी आगामी काळात ती राहणार नाही. कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाता कामा नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे. याशिवाय अधिका-अधिक संस्थात्मक प्रसुतीसाठीही प्राथमिक आरोग्य केंद्रांचा उपयोग करण्यासाठी काही पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
आता आरोग्य केंद्रांची नियमित तपासणी
By admin | Updated: August 27, 2014 23:38 IST