लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आरटीओ कार्यालयातर्फे हजारो, लाखो रुपयांच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र गेल्या दोन वर्षांपासून अवघ्या ५० पैशांच्या कागदावर दिले जात आहे. मुंबईसह अन्य काही शहरांतील आरटीओ कार्यालयात स्मार्ट कार्ड स्वरूपात वाहन नोंदणी प्रमाणपत्र दिले जात आहे; परंतु औरंगाबादकरांना त्याची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.वाहन चालविताना चालकाने कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांनी मागणी केल्यानंतर कागदपत्रे दाखवावी लागतात. कागदी वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) सतत हाताळल्यास खराब होत असल्याने वाहनचालक झेरॉक्स प्रत जवळ ठेवत होते. २००७ मध्ये डिजिटल युगात प्रवेश करणा-या आरटीओ कार्यालयाने वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र स्मार्ट कार्डद्वारे देण्यास सुरुवात केली होती; मात्र खासगीकरणातून सुरू झालेले हे काम अचानक बंद झाले. त्यामुळे गेली दोन वर्षे आरसी बुकचे ‘कागदी घोडे’ आरटीओ कार्यालय नाचवत आहे.पुन्हा एकदा कागदी प्रमाणपत्र सोबत ठेवण्याची कटकट वाहनधारकांना सहन करावी लागत आहे. मुंबई (मध्य) आरटीओ कार्यालयाने दोन दिवसांपूर्वी स्मार्ट कार्ड स्वरूपात वाहन नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. इतर काही शहरांमध्येही याची सुरुवात झाली आहे. औरंगाबादेत ही सुविधा कधी सुरू होणार, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.
महागड्या वाहनांची नोंदणी ५० पैशांच्या कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:55 IST