औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिकेचे आॅनलाईन तक्रार निवारण प्रणालीकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. मनपाकडे गेल्या पाच वर्षांत तब्बल २,२०२ नागरिकांनी आॅनलाईन तक्रारी नोंदविल्या. परंतु आतापर्यंत यापैकी अवघ्या ५ तक्रारींचेच निवारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मनपा या आॅनलाईन तक्रार निवारण प्रणालीवर दरवर्षी ६५ हजार रुपये खर्च करीत आहे.महानगरपालिका प्रशासनाकडून स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात संगणकीकरणाचाही समावेश आहे. याच दृष्टीने मनपा आयुक्त पी. एम. महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करा आणि स्मार्ट व्हा, असे आवाहन केले. परंतु त्याच वेळी मनपात असलेल्या आॅनलाईन तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. उपमहापौर प्रमोद राठोड यांनी मागविलेल्या अहवालावरून ही बाब समोर आली आहे. मनपा प्रशासनाने १५ आॅगस्ट २०१० रोजी ही प्रणाली सुरू केली. त्यासाठी राज्य सरकारने विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले. यात नागरिकांनी दाखल केलेल्या आॅनलाईन तक्रारींचे वेळेत निवारण करणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंतच्या तक्रारी आणि निवारणाचा ओघ पाहता तसे झालेले नाही. आजपर्यंत या प्रणालीत मनपाकडे एकूण २,२०२ तक्रारी प्राप्त झाल्या. परंतु त्यातील केवळ पाचच तक्रारी प्रशासनाने निकाली काढल्या आहेत. उर्वरित तब्बल २,१९७ तक्रारी अजूनही प्रलंबित आहेत. आयुक्त स्तरावरच प्रलंबितया प्रणालीत नागरिकाने आॅनलाईन तक्रार केल्यानंतर ती पहिल्यांदा संगणक विभागाकडे येते. तेथून ती तक्रार ज्या विभागाशी संबंधित असेल, त्या विभागाकडे पाठविली जाते. या तक्रारीवर कारवाईसाठी संबंधित विभागाला ३ दिवसांचा कालावधी दिला जातो. या कालावधीत त्या तक्रारीवर निर्णय न झाल्यास ती तक्रार आपोआप मनपा आयुक्तांकडे जाते. त्यामुळे सध्या सर्व २,१९७ तक्रारी आयुक्त स्तरावर प्रलंबित आहेत. मनपाने तक्रार निवारणाच्या प्रणाली राज्य सरकारकडून सॉफ्टवेअरची सेवा घेतली. या प्रणालीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम सरकारने नेमलेल्या व्यक्तीकडून केले जाते. त्यासाठी मनपा वर्षाला ६५ हजार रुपये खर्च करते. गेल्या पाच वर्षांत या प्रणालीच्या देखभाल, दुरुस्तीवर एकूण ३ लाख २५ हजार रुपये खर्च झाले आहेत. दुसरीकडे पाच वर्षांत केवळ पाचच तक्रारींचे निवारण झाले आहे. तक्रारींचा विचार करता मनपाकडून ६५ हजारांत एका तक्रारीचे निवारण होऊ शकल्याचे दिसून येत आहे.
पाच वर्षांत अवघ्या पाच तक्रारींचे निवारण; खर्च मात्र सव्वातीन लाख
By admin | Updated: August 4, 2015 00:52 IST