बापू सोळुंके , औरंगाबाद हर्सूल मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली कारागृहरक्षक पदाची भरती लालफितीत अडकली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण न करताच प्रशासनाने दोन वर्षांत अन्य दोन वेगवेगळ्या भरती प्रक्रिया पूर्ण केल्या. तीन वर्षांपूर्वी कारागृहरक्षक पदासाठी अर्ज केलेले उमेदवार मात्र आमच्या भरती प्रक्रियेचे घोडे कोठे अडले, असा सवाल करीत आहेत. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर मात्र कारागृह प्रशासन देत नसल्याने मैदानी चाचणी दिलेले १६ हजार उमेदवार हवालदिल झाले आहेत. राज्यातील हर्सूल हे एक प्रमुख कारागृह आहे. या कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारासह, विविध गुन्ह्यांत शिक्षा झालेले हजारो कैदी शिक्षा भोगत आहेत. कारागृहाच्या प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा चार पट कै द्यांना तेथे ठेवण्यात आलेले आहे. अशा या महत्त्वाच्या कारागृहातील कारागृहरक्षक पदाच्या २०१ जागा भरण्यासाठी प्रशासनाने डिसेंबर २०१३ मध्ये जाहिरात प्रकाशित केली होती. या जाहिरातीनुसार अर्ज दाखल करण्याच्या ६ जानेवारी २०१४ या शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे ४० हजारांहून अधिक उमेदवारांनी कारागृह प्रशासनाकडे अर्ज दाखल केले होते. या उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर प्रशासनाने १६ हजार ७५८ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पात्र ठरविले. मात्र या उमेदवारांची मैदानी चाचणी तातडीने घेण्यात आली नाही. मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यासाठीही प्रशासनाकडून विशेष काही हालचाली झाल्या नाहीत. या भरती प्रक्रि येशी आपल्याला काहीही देणे-घेणे नाही, या आविर्भावातच प्रशासनाचा कारभार सुरू होता. उमेदवारांनी जेव्हा प्रशासनाकडे चकरा मारण्यास सुरुवात केली तेव्हा तब्बल दोन वर्षांनंतर आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. या मैदानी चाचणीतील उमेदवारांचे गुण एमकेसीएलने संकेतस्थळावर प्रकाशित केले आहेत. कारागृह प्रशासनाने २०१३ ची भरती प्रक्रिया जैसे थे ठेवली असली तरी नंतर सलग दोन वर्षे वेगवेगळ्या जाहिराती काढून दोन स्वतंत्र भरती प्रक्रिया राबविली. या भरती प्रक्रिया पूर्णही करण्यात आल्या. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना प्रशासनाने रुजूही करून घेतले. त्यापैकी काही जण प्रशिक्षणाला गेले आहेत, तर काही उमेदवारांचे प्रशिक्षणही पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारागृह प्रशासनाने मैदानी चाचणी तब्बल दोन वर्षांनंतर घेतली आता लेखी परीक्षा तातडीने घेतली जाईल, अशी आशा उमेदवारांना होती. मात्र मैदानी परीक्षेला आठ महिने उलटले तरी लेखी परीक्षेबाबत कोणत्याही हालचाली प्रशासनाकडून होत नाही. त्यामुळे उमेदवार पुन्हा हवालदिल झाले आहेत. मात्र प्रशासनाकडून त्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही.
३ वर्षांपासून रखडली कारागृहरक्षक भरती
By admin | Updated: June 14, 2016 00:07 IST