छत्रपती संभाजीनगर : भारतीय लष्करामध्ये अग्निवीर योजनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल २५ हजार जागांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी १३ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. २२ मार्चपर्यंत प्रत्येक पात्रताधारकांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर कॉमन एन्ट्रन्स एक्झाम अर्थात सीईई २२ एप्रिल राेजी घेतली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रियेतूनही उमेदवारांना जावे लागते. त्यानंतर अंतिम निवड केली जाणार आहे. २५ हजार पदांमध्ये भारतीय लष्करातील विविध विभागातील रिक्त पदांचा समावेश आहे.
संपूर्ण माहिती या वेबसाइटवरभारतीय लष्करात प्रवेश करण्यासाठी अग्निवीर योजना लागू केलेली आहे. कोणत्या विभागात किती जागा उपलब्ध आहेत त्याविषयीची संपूर्ण माहिती https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी लॉगीन करावे लागेल. त्यानंतरच अर्ज पूर्ण भरता येईल.
निवडीचे दोन टप्पेऑनलाइन लेखी परीक्षा : भारतीय लष्कराने युवकांची निवड करण्यासाठी २२ एप्रिल रोजी ऑनलाइन परीक्षा ठेवली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनाच पुढील भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.प्रत्यक्ष भरती : ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष मैदानावरील भरती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यात उंची, वजन इ.ची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल. तसेच विविध कसरतींच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. प्रत्येक टप्प्यावर गुण दिले जातात. त्या सर्वांचे गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
अर्ज कसा कराल?भारतीय लष्करातील अग्निवीर योजनेच्या माध्यमातून प्रवेश करण्यासाठी https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरताना लागणाऱ्या बाबींची माहितीही संकेतस्थळावरच देण्यात आलेली आहे.
कोणकोणती पदे?भारतीय लष्करात आवश्यक असणारी अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल, लिपिक, स्टोअर किपर, ट्रेड्समन, नर्सिंग, फार्मा इ. विभागांतील पदांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.
आठवी, दहावी पास आणि आयटीआय झालेल्यांनाही संधीभारतीय लष्करात जाण्यासाठी आठवी, दहावी पास उत्तीर्ण असलेल्यांसह आयटीआय, डी.फार्मसीला प्रवेश घेतलेल्या उमेदवारांनाही संधी उपलब्ध करून दिली आहे. दहावीला कमीत कमी ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्याशिवाय काही पदांसाठी विज्ञानचे विषय असणेही अनिवार्य आहे.