औरंगाबाद : महापालिकेच्या नागरिक मित्र पथकांनी मंगळवारी दिवसभरात शहरात विनामास्क वावरणे, रस्त्यावरच थुंकणे, कचरा टाकणे, बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे व प्लास्टिक वापराप्रकरणी एकूण ४३ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला. या कारवाईदरम्यान पथकाला जुन्या शहरातील अंगुरीबाग येथे एका ठिकाणी प्लास्टिकचे डेकोरेशन करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधिताला पाच हजार रूपयांची पावती देत दंड वसूल करण्यात आला.
सफारी पार्कच्या निविदा प्रक्रियेला विलंब
औरंगाबाद : मिटमिटा येथील शंभर एकर जमिनीवर सफारी पार्क उभारले जाणार आहे. या परिसराला एखाद्या किल्ल्यासारखा लूक दिला जाणार आहे. नियोजनानुसार लवकरच पहिल्या टप्प्यातील कामाला प्रारंभ होणार आहे. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून सफारी पार्कसाठी दाखल झालेल्या निविदांच्या तांत्रिक मूल्यांकनाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अद्याप कंत्राटदार कंपनी अंतिम झालेली नाही. निविदांच्या तांत्रिक मूल्यांकनाला आणखी आठवडाभराचा अवधी लागणार आहे.
समृद्धीच्या बछड्यांचे लवकरच नामकरण
औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात समृध्दी वाघिणीने महिनाभरापूर्वी पाच बछड्यांना जन्म दिला. हे पाचही बछडे मादी अर्थातच वाघिणी निघाल्या आहेत. या वाघिणींना साजेशी नावे दिली जाणार आहेत. पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्याशी चर्चा करून मार्च महिन्यात समृद्धीच्या बछड्यांचे नामकरण केले जाईल, अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी बुधवारी दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विकासकामांची पाहणी
औरंगाबाद : महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांची संयुक्त पाहणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी केली. महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गरवारे क्रीडा संकुल येथील जलकुंभाच्या कामाची पाहणी केली. यानंतर कलाग्राम ते प्रोझोन मॉलपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. तसेच चिकलठाणा येथील नवीन क्रीडा संकुलाची पाहणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदी उपस्थित होते.