बीड : येथील राजे संभाजी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या रुख्माई गोविंद मूकबधीर व मतिमंद शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश बुधवारी प्रादेशिक उपायुक्तांनी दिले. या कारवाईने अपंग संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. रुख्माई गोविंद मूकबधीर व मतिमंद शाळेत गेल्या काही महिन्यांपूर्वी शिक्षक व संस्थाचालकांत वाद उफाळून आला होता. शिक्षकांनी संस्थेविरुद्ध आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन सीईओंनी त्रीसदस्यीय समिती नेमून चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार समितीने चौकशी अहवाल सादर केला होता. सीईओ नामदेव ननावरे यांनी समाजकल्याणच्या प्रादेशिक उपायुक्तांना अहवाल पाठवून पुढील कार्यवाही करण्याचे सूचविले होते. त्यानुसार प्रादेशिक उपायुक्तांनी सुनावणी घेतली. संस्था, संस्थेतील कर्मचाऱ्यांचे म्हणणेही नोंदविले होते. प्रादेशिक उपायुक्त जे. आर. वळवी यांनी कर्मचारी, संस्थेत समन्वयाचा अभाव असल्याने संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्याने रुख्माई गोविंद मतिमंद व मूकबधीर शाळेतील विद्यार्थी इतर शाळेत प्रवेशासाठी पाठवावेत किंवा पालकांकडे सोपवावेत, असे आदेश प्रादेशिक उपायुक्त वळवी यांनी दिले आहेत. संस्थेतील कर्मचाऱ्यांचे इतर संस्थेत समायोजन होईल. (प्रतिनिधी)
मूकबधीर, मतिमंद शाळेची मान्यता रद्द
By admin | Updated: May 21, 2015 00:30 IST