उस्मानाबाद : जीवघेण्या एड्स आजाराबाबत आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे एचआयव्ही बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी घट होताना दिसत आहे़ सन २०१४-१५ मध्ये ३६ हजार ३७ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली होती़ यातील ६१४ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले होते़ तर सन २०१५-१६ मध्ये आजवर २०५८३ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली असून, यात केवळ २९३ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे़ मागील दहा वर्षापासून सुरू असलेल्या तपासणीत प्रत्येक वर्षी ‘पॉझिटीव्ह’ची आकडेवारी समोर येताना दिसत आहे़असुरक्षित शारीरिक संबंधामुळे फैलावणारा एड्स या जीवघेण्यात आजाराची प्रारंभीच्या काळात अनेकांना अधिकशी माहिती नसल्याने तपासणीअंती एचआयव्हीची लागण झालेल्यांची प्रत्येक वर्षी संख्या हजाराच्या घरात जावून ठेपत होती़ राज्यातच नव्हे देशात फैलावणाऱ्या या जीवघेण्या आजाराला अटोक्यात आणण्यासाठी शासनाकडून जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली होती़ शाळा- महाविद्यालयात बैठका, चर्चासत्र, रॅली आदी विविध उपक्रमांद्वारे या आजाराबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे़ जिल्ह्यात प्रारंभी सन २००६- ०७ मध्ये ७९९ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली होती़ यात ११० जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले होते़ सन २००७-०८ मध्ये ४४०४ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली होती़ यात ५१४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ सन २००८-०९ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या ९००३ महिला-पुरूषांपैकी ७२९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ तर सन २००९-१० मध्ये तपासणी करण्यात आलेल्या १७४१८ जणांपैकी ८७२ जणांना एड्सची लागण झाल्याचे समोर आले होते़ तसेच सन २०१०-११ या वर्षात २१९८५ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली होती़ तर यावर्षी ८८१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ सन २०११-१२ मध्ये ३०२४७ जणांची तपासणी करण्यात आली होती़ यात ९३८ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले होते़ सन २०१२-१३ मध्ये २७११६ महिला-पुरूषांची तपासणी करण्यात आली होती़ यात ७८३ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले़ तर सन २०१३-१४ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या ३०३४७ जणांपैकी ६४१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता़ तर सन २०१४-१५ मध्ये एकूण ३६०३७ जणांची तपासणी करण्यात आली होती़ यात ६१४ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचा अहवाल आला होता़ चालू वर्षात सन २०१५-१६ मध्ये आजवर २०५८३ जणांची तपासणी करण्यात आली आहे़ यातील केवळ २९३ जणांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे़ मागील नऊ वर्षाच्या तुलनेत यंदाचा अहवाल निम्म्याने कमी झाला असून, यापुढील कालावधीत याची आकडेवारी मागील वर्षीच्या तुलनेत कमीच येईल, असा विश्वास आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)
‘एचआयव्ही’ला लगाम
By admin | Updated: November 30, 2015 23:31 IST