धारूर ( बीड ) : शहरातील एका फोटो स्टुडीओमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धारुर पोलिसात दोन आरोपीविरुध्द आज सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मधूर बालासाहेब फरतडे व सहदेव चाळक अशी आरोपींची नावे आहेत.
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पिडितेने दिलेल्या फिर्यादीत नोंदवलेल्या जबाबानूसार, पीडिता नृसिंह फोटो स्टुडिओ येथे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेली होती. आरोपीने फोटो काढल्यानंतर प्रिंटकॉपी घेण्यासाठी दुसर्या दिवशी बोलावले. दुसऱ्या दिवशी स्टुडीओत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तसेच याची वाच्यता केल्यास, तुझ्या भावाला खल्लास करेल अशी धमकी दिली. यानंतर काही दिवसांनी दुसऱ्या आरोपीने देखील पिडीतेवर नृसिंह फोटो स्टुडिओमध्येच अत्याचार केला. तसेच हे कोणास सांगू नको अशी धमकी दिली.
याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून आज सकाळी मधूर बालासाहेब फरतडे व सहदेव चाळक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 376, 504 भादवि व कलम 4,5 पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक व्हि. एस आटोळे करीत आहेत.