गावागावांतील आखाड्यात भाजपा-शिवसेना अशी सरळ लढत रंगली आहे. त्यामुळे भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेचे डावपेच कितपत यशस्वी होईल. तर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपला किती यश येईल, हे उत्सुकतेचे राहणार आहे. गोंदेगाव आणि बनोटी या गावात मात्र तिरंगी लढत रंगली आहे. तालुक्यात एकूण ३६ ग्रामपंचायतींमध्ये २७२ जागांसाठी निवडणूक होत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका आणि पदवीधर निवडणुकांचे समीकरण डोळ्यांसमोर ठेवून गावपुढारी निवडणुकांमध्ये रंग भरीत आहेत. सोयगाव तालुक्यातील गावांचे दोन विधानसभा मतदारसंघात विभाजन झालेले आहेत. यामध्ये बनोटी-गोंदेगाव ही गावे कन्नड मतदारसंघात तर आमखेडा, जरंडी हा भाग सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील १६ व कन्नड मतदारसंघातील २० ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.