हिंगोली : येथील १६० वर्षांची परंपरा असलेल्या दसरा महोत्सवाच्या कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते २५ सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आले. या दिवसापासून रामलिला नाटिकेच्या सादरीकरणासही प्रारंभ झाला आहे.दसरा महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन गुरूवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी केले. अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यासह दसरा समितीचे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कासार यांनी प्रदर्शनीत तसेच पोलीस कवायत मैदानावर उभारण्यात आलेले मनोरंजनाचे खेळ व आकाशपाळणे आदींची तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा दोन्ही ठिकाणी संबंधित यंत्रणेला स्वच्छता व सुरक्षीतता अबाधित ठेवण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान, दसऱ्यानिमित्त कृषी प्रदर्शनीसह रामलीला नाटिकेसही प्रारंभ झाला आहे. यंदा मथुरा वृंदावन धाम येथील रामलीला मंडळीच्या वतीने महिला पात्रासह नाटिकेचे सादरीकरण केले जाणार आहे. दररोज रामलिलेतील वेगवेगळे प्रसंग या ठिकाणी सादर केले जाणार आहेत. या शिवाय ऐतिहासीक सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने विविध कलागुण व क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये २६ सप्टेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धा, व्हॉलिबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, निबंध स्पर्धा, हॉकी स्पर्धा, २७ रोजी लॉन टेनिस स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, पानाफुलाची रांगोळी, २८ रोजी कबड्डी स्पर्धा, कराटे स्पर्धा आदी स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
प्रदर्शनीसह रामलीला नाटिकेस प्रारंभ
By admin | Updated: September 27, 2014 00:53 IST