लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको एन-१ भागात ट्यूशनला जाणाऱ्या मुलींची पृष्ठभागावर चापट मारून त्यांची छेड काढणाऱ्या रोमिओला शहर पोलिसांच्या दामिनी पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने शुक्रवारी (दि.७) शोधून काढले. त्याने आतापर्यंत सहा मुलींची छेड काढल्याचे समोर आले असून, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती. मीर मुजाहेद हुसेन (२७, रा. देवडी बाजार, सिटीचौक परिसर) असे अटकेतील रोमिओचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे म्हणाल्या की, सिडको एन-१ येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील ट्यूशनला जाणाऱ्या विद्यार्थिनींना एक मोपेडस्वार सतत छेडतो. तो मुलींच्या पृष्ठभागावर चापट मारून मोपेडने पसार होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या रोमिओवर कारवाई करण्याचे निर्देश दामिनी पथकाला दिले होते. त्यानुसार दामिनी पथकाच्या पोलीस नाईक स्वाती बनसोड, कॉन्स्टेबल कोमल निकाळजे, पूनम झाल्टे, चालक नेहा यांनी सिडको एन-१ परिसरात मुलींच्या ट्यूशनच्या वेळी गस्त वाढविली. मात्र आरोपी तेथे त्यांच्या हाती लागला नाही. यामुळे या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मुलींच्या तक्रारीनुसार रोमिओ हा पांढरा रंग असलेल्या ०१३३ क्रमांकाच्या मोपेडने येतो असे नमूद केले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाच्या आणि ०१३३ हा क्रमांकाची मोपेड पोलिसांना घटनास्थळी दिसली; परंतु या दुचाकीची सिरीज न समजल्यामुळे पोलिसांनी आरटीओकडून ०१३३ क्रमांकाच्या दहा वर्षांपूर्वीच्या मोपेड मालकाची नावे आणि पत्ते मिळविली असता या क्रमांकाच्या चार मोपेड शहरात असल्याचे समजले. चारही मोपेडचालकांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर गुप्तपणे तक्रारदार मुलींना दाखविले असता चारपैकी एक असलेल्या मीर मुजाहेद हुसेन हाच छेड काढणारा असल्याचे त्यांनी ओळखले. मुजाहेद विवाहित असून, तो छावणी बाजारात शेळ्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती दामिनी पथकाने दिली.
मुलींना चापट मारून पळणारा रोमिओ ‘दामिनी’च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 00:40 IST