गंगापूर : मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून केलेल्या तोडफोडीप्रकरणी शिल्लेगाव व एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल तीन गुन्ह्यात गंगापूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ३ हजार रुपयांचा दंड ठोठावून ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मंगळवारी जामीन दिला. २०१० मध्ये राज ठाकरे यांना अटक झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करीत सरकारी मालमत्तेचे विद्रूपीकरण केले होते. याप्रकरणी गंगापूर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येऊन २५ आॅक्टो. २०१० मध्ये या संदर्भात राज ठाकरे यांनी स्वत: हजर राहून जामीन दिलेला होता. त्यानंतर वेळोवेळी न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात जामीनपात्र व अजामीनपात्र वॉरंट निघाले होते. वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे मंगळवारी दुपारी १२ वाजेदरम्यान गंगापूर न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांचे वॉरंट रद्द करून त्यांना तिन्ही आरोपात प्रत्येकी १००० रुपयांचा दंड आकारला व ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश गंगापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तुषार वाघे, अतुल कुलकर्णी यांनी दिले. राज ठाकरे यांच्या वतीने अॅड. जयप्रकाश बाविस्कर, अॅड.कृष्णा ठोंबरे,अॅड.जी. व्ही. सपकाळ, अॅड.रविराज बी. दारुंटे,अॅड. टी. बी. कोल्हे यांनी काम पाहिले.राज ठाकरे गंगापुरात येणार असल्याने जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष जाधव, गंगापूर शहराध्यक्ष अशोक कराळे, मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज ठाकरे यांनी केली दुष्काळी कामांची पाहणीबोर दहेगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि.२६ ) वैजापूर तालुक्यातील दहेगाव, करंजगाव या दोन गावांना भेटी देऊन दुष्काळ पाहणी केली. याप्रसंगी राज ठाकरे यांनी दहेगाव येथील बोर नदीवरील खोलीकरण व रुंदीकरण या कामाचा शुभारंभ केला. बोर नदीचे पात्र मोठे करणे, आजूबाजूची झाडंझुडपं काढणे व चांगल्या प्रकारे काम करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. याप्रसंगी मनसे नेते बाळा नांदगावकर, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, सतीश शिंदे, डॉ. सुनील शिंदे, मोहन उगले यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.3 गुन्हे दाखलपरप्रांतीयांविरोधात प्रक्षोभक भाषण केल्यामुळे मध्यप्रदेशातील न्यायालयाने राज यांना अटक वॉरंट जारी केले होते. ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना हिंमत असेल तर अटक करून दाखवा व परिणामास तयार राहा, अटक झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल अशी चिथावणी देऊन जाळपोळ करावी, अशी चिथावणी कार्यकर्त्यांना दिली होती. सिमेंट बंधाऱ्याचे उद्घाटनराज ठाकरे यांनी करंजगाव येथे बोर नदीवरील खोलीकरण कामाची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांच्या खर्चातून बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्याचे उद्घाटन राज ठाकरे हस्ते करण्यात आले. यावेळी अविनाश अभ्यंकर, अशोक तावरे, राजेंद्र चव्हाण, प्रतापसिंग मेहर, अनिल वाणी, संतोष मिसाळ, गणेश गोरे, सरपंच सोपान बोर्डे, उपसरपंच मीराबाई घोडके, ज्ञानेश्वर कऱ्हाळे उपस्थित होते.
राज ठाकरे यांना दंड व जामीन
By admin | Updated: April 27, 2016 00:31 IST