पाथरी/जिंतूर/आर्वी/सेलू : जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, सेलू व परभणी तालुक्यातील आर्वी येथे गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळली तर काही घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडाली. वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या पावसाने पाथरी शहराजवळील रेणुका साखर कारखाना परिसरातील रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड उन्मळून पडले. यामुळे तब्बल दोन तासांपेक्षा अधिक वेळ सेलू मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तर परभणी तालुक्यातील आर्वी येथे वीज पडूून बैलजोडी दगावल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पाथरी परिसरात वादळी वाऱ्यासह गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडाली. जोराचे वारे सुटल्याने पाथरी-सेलू रस्त्यावर रेणुका शुगर कारखाना परिसरात असलेले बाभळीचे मोेठे झाड उन्मळून पडले. यामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. झाड रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी उशिरापर्यंत कोणीही पुढे आले नाही. दरम्यान, परभणी शहर परिसरात रात्री ८.३० च्या सुमारास हलका पाऊस झाला. बोरी व परिसरात सायंकाळी वादळी वारे झाल्याने झाड उन्मळून पडले. कान्हड येथे घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाल्याची घटना घडली़ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली़ कान्हड येथील गुलाब डोंबे यांच्या घरावरील माडीवरील पत्रे उडून नुकसान झाले़ विजेचे खांब, वृक्ष उन्मळून पडले़ अनेकांच्या कडब्याच्या गंजी उडून गेल्या़ सेलू, चारठाणा, भोगाव, जिंतूर व पूर्णा येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. (वार्ताहर)आर्वीत : वीज पडून बैलजोडी ठारपरभणी तालुक्यातील आर्वी येथे वीज पडल्याने एका बैलजोडीचा मृत्यू झाला. आर्वी गावात दुपारी पावणे तीन ते सव्वातीनच्या सुमारास अर्धातास पाऊस झाला. यामध्ये गावातील वैजनाथ दत्तराव हरकळ यांची बैलजोडी त्यांच्या शेतामध्ये उभी असताना अचानक बैलाच्या अंगावर वीज पडली. त्यामुळे दोन्ही बैल जागेवरच दगावले. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
पाथरी, जिंतुरात पाऊस
By admin | Updated: June 2, 2016 23:21 IST