औरंगाबाद : मराठवाड्याच्या रेल्वेविषयक विविध मागण्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्राचे असल्याने सोडवतील व मराठवाड्याच्या वाट्याला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा आज येथे मराठवाडा जनता विकास परिषदेचे सहचिटणीस प्राचार्य डॉ. शरद अदवंत व उपाध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली. यावेळी श्रीराम वरुडकर, सुरेश कुळकर्णी, शहर समितीचे सचिव सारंग टाकळकर, युवक आघाडीचे समन्वयक प्रा. गजानन सानप आदींची उपस्थिती होती. मराठवाड्याचे रेल्वेविषयक प्रश्न सुटावेत यासाठी रेल्वे मंत्रालयात स्वतंत्र कार्यालयाची मागणी यावेळी करण्यात आली. डॉ. अदवंत म्हणाले, नागपूर, नाशिक या शहरांसाठी मेट्रो सुरू करण्यासाठी तत्त्वत: मंजुरी रेल्वे खात्याने दिली आहे. औरंगाबाद शहराजवळून डीएमआयसी हा मोठा औद्योगिक पट्टा निर्माण होत आहे. शंभर गावांमध्ये स्मार्ट सिटी उभारण्याची योजना भारत सरकारने कायम केली आहे. त्यात औरंगाबाद शहराचा समावेश आहे. प्रचंड वेगाने विस्तारित होणाऱ्या या शहरासाठी मेट्रो रेल्वे सुरूकरण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली पाहिजे. जळगाव-सोलापूर हा रेल्वे मार्ग लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र, हा मार्ग औरंगाबाद मार्गे जावा की जालना या प्रश्नाला उत्तर देण्याचे डॉ. अदवंत यांनी टाळले. यावेळी करण्यात आलेल्या मागण्या अशा : १) नांदेड-अहमदपूर- लातूर रोड, २) परळी-अंबाजोगाई- घाटनांदूर लातूर रोड, ३) बोधन-नर्सी- मुखेड- लातूर रोड,४) मानवत- पाथ्री- सोनपेठ- परळी वैजनाथ, ५) कुर्डुवाडी- परांडा- भूम- कुंथलगिरी- बीड- पैठण मार्गे औरंगाबाद आणि उस्मानाबाद- पूर्णा या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण करण्यात यावे व त्यासाठी २०१५-१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात यावी. खालील रेल्वे गाड्या रोज सुरूकरण्यात याव्यात. १) नांदेड- औरंगाबाद- मनमाड- दिल्ली- अमृतसर- जम्मू-तावी- कटरा एक्स्प्रेस,२) औरंगाबाद- बंगळुरू- तिरुअनंतपुरम- चेन्नई, ३) औरंगाबाद- वाराणसी, ४) औरंगाबाद- जालना- परभणी- पूर्णा- वसमत- हिंगोली- वाशिम- अकोलामार्गे, नागपूर, ५) नांदेड-पूर्णा, ६) नगरसोल- चेन्नई, ७) हैदराबाद- अजमेर, ८) औरंगाबाद- रेनिगुंठा, ९) कोल्हापूर- पूर्णा- नागपूर, १०), हैदराबाद- उस्मानाबाद- पुणे, ११) लातूर- पुणे, १२) ओखा- औरंगाबाद- जालना- रामेश्वरम. खालील मार्गांवर रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात याव्यात. १) कोल्हापूर- औरंगाबाद- धनबाद दीक्षाभूमी एक्स्प्रेस,२) औरंगाबाद- जालना- परभणी- नांदेड- मुदखेड- आदिलाबाद- नागपूरमार्गे हावडा कोलकाता. ३) लातूर- विकाराबाद- रायचूर- तिरुपती आदी.
रेल्वे मागण्या सुरेश प्रभू सोडवतील
By admin | Updated: January 7, 2015 01:03 IST