औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेतर्फे अखेर रेल्वे इंजिन, ब्रेक, वातानुकूलित बोगी, खानपान यामध्ये विद्युत उपकरणांची उपलब्धता, त्यांची देखरेख, उपयोगिता तपासली जाणार आहे. तसेच बोगींमध्ये अग्निरोधक उपकरणांची मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे की नाही, हे तपासले जाणार आहे. या उपकरणांची कमतरता असेल तर ती पूर्ण केली जाणार आहे.नांदेड- मनमाड पॅसेंजर रेल्वेच्या बोगीला आग लागलेल्या घटनेनंतरही दक्षिण मध्य रेल्वेचे प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत होते. याविषयी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने ‘आग रोखीकरण’ विशेष पंधरवडा मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये रेल्वे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे पोलीस हे संयुक्तरीत्या भाग घेणार आहेत. मोहिमेमध्ये रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानक आणि रेल्वे पार्सल कार्यालयाची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने ज्वलनशील पदार्थांची होणारी ने-आण रोखण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोहिमेत रेल्वेचे विशेष तपासणी दल अचानक तपासणी करून फटाके, स्फोटक पदार्थ, ज्वलनशील पदार्थ, गॅस सिलिंडर, शेगडी, स्टोव्ह आदींच्या वाहतुकीवर आळा घालणार आहे.
रेल्वेच्या बोगींची होणार तपासणी
By admin | Updated: November 2, 2014 00:23 IST