संतोष बाबूलाल बोरा (वय ४४,रा. नाथनगर, सिंधी कॉलनी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नाथनगरातील एका व्यापाऱ्याने घरातून गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूचा अवैध व्यापार सुरू केला आहे. त्याच्या घरात हा माल आणून ठेवल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वसंत शेळके, हवालदार शिंगणे, वानखेडे, दंडवते आणि महिला कॉंस्टेबल देवकर यांनी अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांना सोबत घेऊन शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नाथनगर येथे बोरा या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पंचासमक्ष त्यांच्या घराची झडती घेतली असता तेथे प्रतिबंधित केलेला पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि गुटखा ठेवल्याचे आढळून आले. हा साठा जप्त करण्यात आला. अन्नसुरक्षा अधिकारी अजिंठेकर यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्यापाऱ्याला अटक केली.
नाथनगरातील व्यापाऱ्याच्या घरावर धाड; ६८ हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:02 IST