जालना : संपूर्ण जिल्ह्यात रबीच्या पेरण्या पूर्णत: खोळंबल्याने सर्व सामान्य शेतकरी चिंतातूर झाले आहेत. या जिल्ह्यात या वर्षी अल्पसा पाऊस झाला. त्या पावसावरच खरिपाच्या पेरण्या झाल्या. अधूनमधून पडलेल्या पावसावरच खरीप पिके तरली. जगली. मात्र आता परतीच्या पावसाअभावी रबी पेरण्या पूर्णत: धोक्यात आल्या आहेत. दिवाळीचा सण आणि रबीची पेरणीची धावपळ असे चित्र दिसायला हवे होते. परंतु यावर्षी पाऊस खोळंबल्याने खरीप पेरण्या लांबल्या आहेत. मुळात यावर्षी पडलेल्या अल्पशा पावसामुळे जमिनीत ओल नाही. परिणामी रबीची पेरणी करावी तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. या आठवड्यात पाऊस अपेक्षित होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी रिमझिम पाऊस झाला. काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण पसरल्यामुळेच पाऊस हजेरी लावेल व खोळंबलेल्या रबी पेरण्यांना वेग येईल असे अपेक्षित होते. दुर्दैवाने वातावरण बदलून सुद्धा पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. येत्या चार आठ दिवसात पाऊस पडला तर रबीची पेरणी होऊ शकेल, अन्यथा रबी हंगाम सुद्धा संकटात येईल अशी भीती ग्रामीण भागात व्यक्त केली जात आहे. गहू व ज्वारी ही दोन पिके महत्वपूर्ण आहेत. पेरा घसरल्यास शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही.विशेषत: जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होईल असे चित्र दिसत असून, शेतकरी बदललेल्या या वातावरणात आकाशाकडे मोठ्या अपेक्षेने डोळे लावून बसला आहे. ग्रामीण भागात यावर्षी दिवाळी जेमतेम झाली. आपापल्या कुटुंबियांबरोबर शेतकऱ्यांसह शेत मजुरांनी पदरमोड करीत दिवाळीचा आनंद साजरा केला. आता शेतमजूर वर्ग कामाच्या शोधार्थ नाशिकपासून पुणे मुंबईपर्यंत धाव घेईल अशी चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
रबीच्या पेरण्या खोळंबल्या
By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST