शरद वाघमारे, मालेगावपावसाने सतत तीन महिने मारलेली दडी दुष्काळाची स्थिती संभवत असताना जिद्दीने एका एकरात टोमॅटो उत्पादनासाठी माल्चिंक (पॉलिथिन) पेपरचा वापर करुन दररोज एक क्विंटल उत्पादन घेण्याची किमया कासारखेडा येथील युवा शेतकऱ्याने साधली असून नांदेड-मालेगाव रस्त्यालगतची टोमॅटो झाडे अनेकांची लक्ष वेधून घेत आहेत.कासारखेडा येथील गोपाळ मुंजाजी आढाव या युवा शेतकऱ्याने नांदेड-मालेगाव रस्त्यालगत असलेल्या कासारखेडा येथील आपल्या एक एकर शेतात टोमॅटो पीक घेण्याचे निश्चित केले. त्यांनी या लागवडीसाठी मल्चिंक (पॉलिथिन) पेपरचा वापर करुन टोमॅटोची ५ बाय २ फुटावर रोपे लावली. यासाठी त्यांनी सेंद्रिय खताचा वापर केला. मल्चिंगमुळे त्यांना निंदणीचा खर्च आला नाही. शिवाय पाणीही व्यवस्थितरित्या मिळाले. सद्य:स्थितीत एक एकर शेतीतून दिवसाला एक क्विंटल टोमॅटोचे उत्पादन होते. ३० रुपये प्रति किलो प्रमाणे भाव मिळत असल्याचे आढाव यांनी सांगितले. त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम या ठिकाणी हा प्रयोग पहिला आहे. तणाच्या खर्चापासून मुक्तता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मल्चिंकचा वापर केल्यास निश्चित फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ्यात टोमॅटोचे भाव ८० रुपये किलो पर्यंत पोहोचले होते़ कोणत्या वेळी कोणते पिक फायदेशीर ठरेल याची निवड करता आली पाहीजे़ युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगारसंपन्न होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहीजेत़ परिश्रम कधी वाया जात नाही़ ही बाब शेतीच्या बाबतीत अधीक चांगल्या प्रकारे लागू होते़ युवकांनी या क्षेत्रात येवून नवनवीन प्रयोग करण्यासाठी आढाव यांचा आदर्श घेण्याची गरज आहे़
एकरात दरदिवशी क्विंटलभर टोमॅटो
By admin | Updated: September 4, 2014 00:20 IST