हिंगोली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा कचेरीसमोर आज सायंकाळच्या सुमारास उपोषणकर्त्यांची रांग लागल्याचे दिसून आले. मात्र पालकमंत्री येणार नसल्याचे कळताच काहींनी काढता पाय घेतला.हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील मंगलबाई पवार यांनी गायरान जमिनीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले. औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथील ग्रामस्थांनी गावाची जमीन पडिक दाखविल्याबद्दल कारवाईची व डीआरडीएच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या ३३ जणांना घरकुलाची मागणी करण्यात आली. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील कॉ. बालासाहेब शिंदे व इतरांनी ग्रामसेवकाने पायका योजनेत अपहार केल्याचा आरोप करून कारवाईच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.कळमनुरी तालुक्यातील संतोष पर्वत यांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यास सेवक या पदावर नियुक्ती देण्याची मागणी केली. वसमत येथील रुग्णालयात रुजू झाल्यानंतरही काही दिवसांतच कमी करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले.समाजकल्याण अधिकाऱ्यांनी आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन बंद केल्यामुळे हत्त्ता, वरूड तांडा, जवळा बाजार व गांगलवाडी आश्रमशाळेतील शिक्षकांनी उपोषणास प्रारंभ केला आहे. कौठा रोड वसमत येथे डॉ.आंबेडकर पुतळा, दत्त मंदिर, जि. प. शाळा परिसरातील देशी दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले. इतरही अनेकांनी निवेदन देऊन उपोषण सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा कचेरीसमोर उपोषणकर्त्यांची रांग
By admin | Updated: August 15, 2014 00:05 IST