श्रीनिवास भोसले । लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: नांदेड जिल्ह्यात आणि शहरातील वीजचोरी कोट्यवधींच्या घरात आहे़ येणाऱ्या काळात वीजचोरी थांबली नाही तर त्यास शाखा अभियंता, अभियंता, उपअभियंता आदी अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्या वेतनातून वीजचोरीची रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा देत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीने अधिकाऱ्यांची बत्ती गुल झाली होती़ नांदेड परिमंडळातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी येथील कुसुम सभागृहात जनता दरबार घेतला़ यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे अभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते़ जवळपास तीन तास चाललेल्या जनता दरबारात ग्राहकांच्या प्रश्नाबाबत ऊर्जामंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़ घाम फुटलेल्या अनेकांना नीट उत्तरेही देता आली नसल्यामुळे सभागृहात कार्यक्रमादरम्यान अनेकवेळा हशा पिकला़ अधिकारी सत्य बोलत आहेत की नाही, याची लगेच खातरजमा करताना, अधिकाऱ्यांची होणारी धावपळही चर्चेचा विषय ठरली़ जिल्हाभरातील ग्राहकांनी लाईनमनपासून ते मुख्य अभियंता यांच्यापर्यंत येणाऱ्या अडचणींचा पाढाच बावनकुळे यांच्यासमोर वाचला़ ग्राहकांच्या प्रश्नाचे शाखा अभियंता, अभियंत्यांना जागेवरच उत्तरे द्यावी लागत असल्याने अनेकांची पाचावर धारण बसली होती़ उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा दम दिल्याने अनेकांनी आपल्या चुका व कामास होत असलेल्या विलंबाची कबुली दिली़ प्रशासनात दुशासन राज्यात सुशासन आहे, परंतु प्रशासनात दुशासन आजही कार्यरत असल्याचे सांगत त्यांना दुरूस्त करण्याची विनंती एका ज्येष्ठ नागरिकाने केली़ तसेच अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनदेखील वीजमीटर मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली़
प्रश्नांची सरबत्ती अन् अधिकाऱ्यांची बत्ती गुल
By admin | Updated: July 1, 2017 00:25 IST