भारत दाढेल । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शिक्षण विभागाला जिल्हा परिषद शाळेसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचा विसर पडल्याने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घसरण झाली आहे़ जिल्हा परिषद शाळेतील आठवीतील शिष्यवृत्तीधारकांची संख्या केवळ २५ असून पाचवीचे ७५ विद्यार्थी आहेत़ जिल्ह्यातील पाचवीच्या २६ हजार ३७८ विद्यार्थ्यांपैकी ४८५ तर आठवीच्या १९ हजार २ पैकी ४६६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत़ या आकडेवारीमुळे नांदेड जिल्हा राज्यात २४ व्या क्रमांकावर आला आहे़ तीन वर्षापूर्वी जिल्ह्यात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियानाचा प्रारंभ झाला़ जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुले गुणवंत झाली पाहिजे़, या बांधिलकीच्या भूमिकेतून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकारातून हे अभियान यशस्वीपणे पूर्ण झाले होते़ वर्षभर मुलांच्या चाचण्या घेण्यात आल्या़ पालकसंवाद, ग्रामसंवाद, लक्षवेधी नमस्कार यामुळे सुसंवाद आणि त्यातून शाळेबद्दलची आत्मीयता निर्माण झाली होती़ शिक्षकांना स्वातंत्र्यदिनी, महिलादिनी, महाराष्ट्रदिनी गौरविण्यात आले़ जिल्ह्यातील ही प्रेरणा इतर शाळांसाठीसुद्धा परिणामकारक ठरली़ शिक्षकांनी ज्ञानरचनावादाची कास धरली होती़ प्रत्येक मूल हे स्वत:च स्वत:च्या ज्ञानाची रचना करीत असते, हे या रचनावादाचं सूत्ऱ त्याआधारे शाळेत तळफळ्यांची रंगोटी झाली़ मुलं गटात बसून एकेकाने स्वत:च कृती करू लागली़ कृतिशीलता हा शिक्षणाचा आत्मा बनली पाहिजे़ यासाठी जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ जोरात सुरू झाली होती़ परंतु गत वर्षभरापासून ही चळवळ थांबली आहे़ शिक्षण विभागाला या उपक्रमांचा विसर पडला आहे़ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणतेही नियोजन करण्यात आले नाही़ त्याचा परिणाम निकालावर झाला़ शिक्षकांच्या बदल्या, विभागांतर्गत होणाऱ्या घटना, घडामोडीत अधिक लक्ष घालण्यात येत असल्याने शैक्षणिक उपक्रम राबवायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ जिल्ह्यातील पाचवीत शिकणारे २६ हजार ३७८ पैकी ३ हजार १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तर ४८५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले़ आठवीत १९ हजार २ पैकी १ हजार ६८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तर ४६६ विद्यार्थी धारक झाले़ जिल्हा परिषद शाळेतील पाचवीत शिकणारे ८ हजार ११४ पैकी ४४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तर ७५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले़ आठवीतील १ हजार ८९८ पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले़
गुणवत्तेचा आलेख घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 00:33 IST