औरंगाबाद : कोरोनाचा वाढता कहर पाहता इयत्ता पहिली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकट पास करायचे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परीक्षारूपी तिकीट न फाडता सरसकट सगळ्याच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घेऊन जाणारी ही शिक्षणाची ढकलगाडी कुणाला पटली आहे, तर कुणाला खटकली आहे. पालक आणि शिक्षणतज्ज्ञांच्याकडून याबाबतीत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे चुकीचे आहे. अगदी परीक्षाच नाही, तरी इतर कोणत्या मार्गांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. याउलट काही शिक्षणतज्ज्ञांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा परीक्षा न घेतलेलीच बरी आहे, असे सांगितले.
शहरी भागात खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा कोणताही परिणाम झालेला नाही. कारण इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये सध्या १ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरू असून शाळेच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनच पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.
चौकट :
औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या
पहिली - ८८३२९
दुसरी - ८८१८९
तिसरी - ८८२०२
चौथी - ८९२११
पाचवी - ८७८६९
सहावी - ८६२०७
सातवी - ८५०४४
आठवी - ७९६३३
नववी - ७५८९१
अकरावी - ५५१७१
चौकट :
शिक्षणतज्ज्ञ म्हणतात-
१. प्रत्येक शाळेतील शिक्षक किंवा शिक्षकांच्या घरातील लोक सध्या कोरोनाने बाधित आहेत. दुसऱ्या लाटेचे स्वरूप अत्यंत तीव्र असून याकाळात परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचे सुरक्षित असणे सर्वाधिक महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाचा परीक्षा न घेण्याचा निर्णय योग्य असून केंद्र सरकारनेही हे वर्ष ‘झिरो एज्युकेशन इयर’ म्हणून घोषित करावे.
- एस. पी. जवळकर
२. विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे, हा राज्य शासनाचा निर्णय काही अंशी चुकीचा वाटतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाप्रतीचे गांभीर्य नष्ट होत आहे. परीक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या मूल्यमापनासाठी घेतली जाते. थेट परीक्षा न घेता कोणत्या न कोणत्या पद्धतीने जमेल तसे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करूनच त्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश द्यायला पाहिजे होता.
- सतीश तांबट
३. सर्वत्र कोरोनाचा उद्रेक होत असताना राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आणणे परवडणारे नाही. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात नाही. यावर्षी मागे पडलेला अभ्यास पुढेही भरून काढता येतो.
- देवेंद्र सोळंके, मुख्याध्यापक
चौकट :
पालक म्हणतात
१. परीक्षा न घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय असला तरी खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा होत आहेत. त्यामुळे या मुलांना तर परीक्षा देऊनच पुढच्या वर्गात जायचे आहे, त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान नाही, असे काही पालकांचे मत आहे.
२. परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचे बहुसंख्य पालकांनी स्वागत केले आहे. परीक्षा घेतल्या असत्या तरी आम्हाला मुलांना शाळेत पाठविणे सुरक्षित वाटले नसते, असे अनेक पालकांचे म्हणणे आहे. तर परीक्षा न घेता मुलांना पुढच्या वर्गात पाठविणे काही पालकांना चुकीचे वाटत आहे.