हिंगोली : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापूस खरेदीचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असताना पुन्हा खरेदीची मुदत वाढविण्यात आली. खरेदीची तारीख २५ मेपर्यंत वाढवली असली तरी भाव स्थिर राहतील याची शाश्वती नसल्याने सोमवारी १ हजार २४० क्विंटल कापसाची आवक झाली. त्यात उत्पादकांना रास्त भाव मिळत ५ हजार २६० रूपयांचा कमाल दर मिळाला. प्रारंभापासून आजपर्यंत १ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. मागील आठवड्यात ५ मे रोजी हिंगोली बाजार समितीकडून कापूस खरेदी बंद करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र उत्पादकांकडे बर्यापैकी कापूस शिल्लक असल्याने मागणीनुसार १२ मेपर्यंत वाढ करण्यात आली. आता पुन्हा ताखीर वाढवून २५ मे करण्यात आली आहे. यापुढे रास्त भावाची हमी नसल्याने उत्पादकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता. सकाळापासून चढ्या दरापासून लिलावाची सुरूवात झाली. किमान दर ४ हजार ८९० रूपयांपासून सुरू झालेला लिलाव अखेरीस ५ हजार २६० रूपयांपर्यंत गेला. सध्या खरेदीदारांची संख्या घटली असली तरी उत्पादकांना बर्यापैकी भाव मिळाला. मोजके चार ते पाच व्यापार्यांत तेवढी स्पर्धा नसतानाही उत्पादकांना समाधानकारक भाव मिळाला. दिवाळीपासून सुरू झालेली खरेदी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आजपर्यंत १ लाख क्विंटल कापसाची खरेदी बाजार समितीकडून खासगी व्यापार्यांनी केली. परभणी जिल्ह्यातील सेलू बाजार समितीत सोमवारी किमान ४ हजार ३०० तर कमाल ५ हजार ११४ रूपये भाव मिळाला. देऊळगाव राजा येथील बाजार समितीत दराने पाच हजारांचा टप्पा ओलांडला. सकाळी बाजार समितीत ४ हजार ७५० रूपयांपासून सुरू झालेला लिलाव ५ हजार १५० रूपयांपर्यंत गेला. दुसरीकडे कोटल बाजार समितीन उत्पादकांना चांगला भाव मिळाला. किमान लिलाव ५ हजार रूपयांपासून सुरू होवून कमाल ५ हजार ५१ रूपयांपर्यंत गेला. मराठवाड्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत हिंगोलीत बर्यापैकी सोमवारी कापसाला भाव होता. उत्पादकांची मागणी पाहता पुन्हा एकदा बाजार समितीने खरेदीची मुदत वाढविली आहे. म्हणून आणखी १२ दिवस खरेदीसाठी उत्पादकांना मिळणार आहेत. मात्र यापूढे मुदत वाढविली जाणार नसल्याची माहिती हिंगोली बाजार समितीचे सचिव जब्बार पटेल यांनी दिली. (प्रतिनिधी) सोयाबीनचीही आवक सोयाबीन खरेदीचा हंगाम संपत आला आहे. काही उत्पादकांकडे माल शिल्लक असल्याने सोयाबीनचा माल बाजार समितीत खरेदीसाठी येत आहे. सोमवारी खरेदीचा दिवस असला तरी आवक कमी होती. मात्र भाव बर्यापैैकी असल्याने ३ हजार ८१० रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. पुढे भाव वाढत जावून ४ हजार ६२६ रूपयांपर्यंत कमाल दर गेला. सध्या चांगला दर मिळत असला तरी उत्पादकांकडे माल शिल्लक नाही. परिणामी सोमवारी ४५७ क्विंटल कापसाची आवक होती.
१ लाख क्विंटल कापसाची खरेदी
By admin | Updated: May 13, 2014 01:06 IST