जालना : देशात आज असंख्य रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदान करून तुम्ही त्यांना जीवनदान देऊ शकता. अवयवदानाद्वारे मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत राहण्यासाठी समाजातील प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.अवयवदानाविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी शहरातून मंगळवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.गांधी चमन येथे जिल्हाधिकाºयांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक एस. बी. म्हस्के, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील, जिल्हा नोडल अधिकारी डॉ. संजय साळवे, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. केशव इंगळे, दीपक झारखंडे, अवयवदान समुपदेशक योगिता काकडे, एस. डब्ल्यू पाईकराव आदींची उपस्थिती होती.अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यात अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अवयवदानाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.डॉ. राठोड म्हणाले की, अवयवदान- सर्वात श्रेष्ठ दान आहे. अवयवदान करणे हा माणुसकीचा धर्म आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात अवयवदानाचे फार्म भरून द्यावेत. यावेळी अवयवदानाबाबत सर्व उपस्थितांना प्रतिज्ञा देण्यात आली. गांधीचमन ते मस्तगड, मुथा बिल्डिंगमार्गे मामाचौकात रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, डॉक्टर्स यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला.
शहरात रॅलीद्वारे अवयवदानाचा महाजागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:48 IST