औरंगाबाद : शहरातील १४ लाख नागरिकांना चांगली दर्जेदार सेवा देण्याचे दायित्व महापालिकेचे आहे. भविष्यात प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असा आदेश आज राज्य ग्राहक समितीने मनपाला दिला. महापालिकेत आज सायंकाळी ग्राहक समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समितीने मनपाच्या संपूर्ण कारभाराचा आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी घनकचरा, आरोग्य, पाणीपुरवठा आदी सोयी- सुविधांची माहिती दिली. उपायुक्त रवींद्र निकम यांनी शिक्षण विभागाची माहिती दिली. ग्राहक समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी नमूद केले की, शहरातील नागरिकांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. विविध हॉटेलमध्ये मिळणारे सुटे पाणी तपासण्याचे काम मनपाचे आहे. बाटलीत बंद असलेले पाणी तपासण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाकडून होते. प्रत्येक हॉटेलमध्ये वेटर बाटलीबंद पाण्याचा आग्रह धरतो. त्याने हा आग्रह न धरता सुटे पाणीच दिले पाहिजे. मनपाच्या आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी करायला पाहिजे. शिक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले की, शिक्षण नाही म्हणून गुन्हेगारी वाढत आहे. या विषयाकडे मनपाने अत्यंत गांभीर्याने बघायला हवे. रस्ते आणि गटार या विषयावर देशपांडे यांनी सांगितले की, यासंदर्भात मनपाने नियोजन करावे. एखाद्या कामाची वॉरंटी पाच वर्षे असेल, तर कंत्राटदाराने अधूनमधून डागडुजी करायला हवी. फूटपाथच्या मुद्यावर समितीने बरीच आगपाखड केली. शहरातील प्रत्येक फूटपाथवर अतिक्रमणे आहेत. फूटपाथ ही ग्राहकांच्या हक्काची आहेत. मनपाला कर भरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला फूटपाथ मिळायला हवे. ठिकठिकाणी अतिक्रमणेच दिसून येतात. फळविक्रेते यावर आपला हक्क दाखवितात. शहानूरमियाँ दर्गा परिसरातील काही उदाहरणेही समितीने दिली. महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्येही चांगल्या दर्जेदार सोयी मिळायला हव्यात. घाटीच्या भरवशावर मनपाने आपली आरोग्यसेवा बळकट करू नये असे नाही.
‘ग्राहकांना दर्जेदार सेवा द्या’
By admin | Updated: December 17, 2015 00:09 IST