पानगाव : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे क्षुल्लक कारणावरून भागुराम नारायण पेद्दे (४५) यांचा मुलगा बालाजी भागुराम पेद्दे या बापलेकाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने ५१ पैकी ५ आरोपींना दोषी ठरविले आहे़ या आरोपींना शुक्रवारी जिल्हा न्यायालयाकडून शिक्षा ठोठावली जाणार असल्याने पानगावात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे़ दरम्यान, पानगावात या शिक्षेसंदर्भात गुरूवारी दिवसभर चर्चा सुरू होती़ पानगाव येथे २६ डिसेंबर २००८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भागुराम पेद्दे व मुलगा बालाजी हे दोघे शौचास बसल्याच्या कारणावरून काही लोकांनी या दोघांचा खून केला होता़ याप्रकरणी ५१ आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ यापैकी दोन आरोपी अल्पवयीन होते़ तर नसीर उस्मान पठाण, बशीरोद्दीन ऊर्फ मुन्ना नसिरोद्दीन काझी, शेख मुनीर शेख नूर, फिरोज रहिमखान पठाण आणि युनूस (सर्व रा़ पानगाव) या आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले आहे़ त्यांना आता न्यायालय काय शिक्षा ठोठावते याकडे पानगावकरांचे लक्ष लागले असून, गावात पोलीस बंदोबस्त आहे़
पेद्दे खून प्रकरणी आज आरोपींची शिक्षा ठरणार
By admin | Updated: March 10, 2017 00:27 IST