जायकवाडी : पिंपळवाडी-पिराची गावात सांडपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. येथील सांडपाणी थेट पैठण- औरंगाबाद रस्त्यावर साचले जाऊ लागले असून, नागरिकांना हकनाक दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबत बुधवारी पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पाहणी केली. तर येत्या आठवडाभरात पिंपळवाडी, मुधलवाडी या ग्रामपंचायतींनी समन्वयाने हा प्रश्न सोडविण्याचा आदेश दिला.
पिंपळवाडीचे पाणी हे मुधलवाडी ग्रामपंचायत हद्दीतून कातपूर नदीला जाते; मात्र मारुती मंदिरपासून जाणाऱ्या सांडपाण्याच्या नाल्यावर अनेकांनी अतिक्रमण केले. त्यामुळे सांडपाणी हे रस्त्यावरून वाहत होते. तर नागरिकांना येणे-जाणे कठीण झाले होते. यांसंदर्भात नागरिकांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे तक्रार केली. बुधवारी तहसीलदार शेळके, मंडळ अधिकारी शैलेश जोशी, पिंपळवाडीचे सरपंच विलास दहीहंडे, मुधलवाडीचे सरपंच प्रकाश लबडे, ग्रामविकास अधिकारी अशोक आहेर, उत्तम भोंडवे, उपसरपंच रहिमोद्दीन पठाण, पोलीस पाटील अशोक चाबुकस्वार यांनी नाला पाहणी केली. तहसीलदार शेळके यांनी सोमवारपर्यंत पिंपळवाडी व मुधलवाडी ग्रामपंचायतीने समन्वयाने जि.प. निधीतून ड्रेनेज लाईनचे नियोजन करण्याचे सुचवले. तर आठवडाभरात नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी काही उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
फोटो : पिंपळवाडीच्या मुख्य रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पाहणी केली. यावेळी उपस्थित ग्रा.पं. सदस्य.
280421\samir rafik pathan_img-20210428-wa0005_1.jpg
पाहणी करताना तहसीलदार