बीड: शेतकरी, अडल्या-नडल्या लोकांना पैसे देऊन अवाच्या सव्वा दराने व्याज आकारणाऱ्या अवैध खासगी सावकारांविरुद्धच्या तक्रारी जिल्हा उप-निबंधक कार्यालयाकडे दाखल झाल्यानंतर तालुकास्तरावर त्यांची चौकशी सुरु आहे़ दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सहायक निबंधक विकास जगदाळे यांनी दिली. जिल्हा उप-निबंधक कार्यालयाकडून सावकार परवाना दिला जातो. त्यांचे व्याज दर ठरविण्यात आलेले असतात. मात्र शासनाची परवानगी न घेता पैसे देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पूर्वी नागरिक खासगी सावकाराच्या तक्रारी करत नसत. मात्र आता तक्रारदारांची संख्या वाढत चालली आहे. पैसे देण्यापूर्वी खासगी सावकार जमिनीची लिखापढी करुन घेतात. व्याज वेळेवर दिले गेले नाही तर चक्रवाढ व्याज लाऊन पैसे उकळतात. पैसे नाहीच मिळाले तर वेळप्रसंगी जमीन स्वत:च्या नावावर करुन घेण्यास मागेपुढेही पाहात नाही. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सहकार खात्याने सावकारी कायदा सक्षमपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कायद्यात नुकताच बदल झाला असून मागील पंधरा वर्षापर्यंतच्या तक्रारींची दखल घेण्यात येणार असल्याने बडे नेते मंडळी, प्रतिष्ठीत व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून सावकारी कायद्याला सहा महिन्यांपूर्वी मान्यता देण्यात आली आहे. तेव्हां मागील पाच वर्षापर्यंतच्या तक्रारींची दखल घेता येत होती. मात्र त्याचा कालावधी वाढवा अशी मागणी सहकार खात्याने राज्य सरकारकडे केली होती. ही मागणी मान्य करत पंधरा वर्षापर्यंतच्या तक्रारींची दखल घेणे शक्य झाले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. (प्रतिनिधी)४जिल्हा उप-निबंधक कार्यालयाकडे ४२ तक्रारींची चौकशी तालुका उप-निबंधकामार्फत होत आहे. चौकशीनंतर त्याचा अहवाल उप-निबंधकांना सादर करण्यात येईल व त्यानंतर पुन्हा त्यावर अंतिम निर्णय होईल असे जगदाळे यांनी सांगितले.
खासगी सावकार चौकशीच्या फेऱ्यात
By admin | Updated: December 1, 2014 00:51 IST