पाथरी : अंगणवाडी तथा महिला साधन केंद्राच्या नावाने पं़ स़ परिसरात बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा वापर महिला बचत गटाने उत्पादीत केलेल्या मालाऐवजी खाजगी वापरासाठी करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षापासून हा प्रकार सुरू असतानाही पं़ स़ प्रशासनाला मात्र याचे काहीच सोयरसूतक नसल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाच्या केंद्रीय अर्थसहाय्य योजनेच्या विशेष कृती कार्यक्रमाखाली २००५ मध्ये पं़स़ आवारामध्ये मार्केटिंग आणि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीसोबतच ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटाने उत्पादीत केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बांधण्यात आलेली चार गाळे महिला बचत गटांना देणे अभिप्रेत होते. परंतु या गाळ्यामध्ये २०११ पासून टोल खरेदी विक्री आणि मंडप डेकोरेशन साहित्य ठेवणे यासाठी ही गाळे भाड्याणे देण्यात आली. वास्तविक पाहता महिला बचत गटांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी या गाळ्यांचा वापर होणे अपेक्षित असताना या बाबीकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. तीन वर्षापासून सदरील गाळ्यांचा खाजगी कामासाठी वापर केला जात आहे. (वार्ताहर)महिला बचत गटांना व्यवसायासाठी गाळे वाटप करणे अभिप्रेत असताना हा प्रकार घडला कसा? याबाबत या प्रतिनिधीने पंचायत समिती प्रशासन आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क केला. ही इमारत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे असल्याने त्यांचीच जबाबदारी असल्याचे पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर वास्तविक पाहता या कार्यालयावर पंचायत समितीचेच नियंत्रण असल्याने पं.स.ही यास जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.
त्या’ गाळ्यात खाजगी उद्योग
By admin | Updated: August 29, 2014 01:30 IST