वसमत : येथील बसस्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्गावरच एका टपरीमध्ये राजरोस चालणाऱ्या अवैध रॉकेल विक्री केंद्रावर वसमत पोलिसांनी आज छापा मारला. या छाप्यात २६० लिटर निळे रॉकेलसह ६ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसमत शहरात अवैध रॉकेल विक्रीने कहर केला आहे. मुख्य रस्त्यावर, बसस्थानकाशेजारी, राष्ट्रीय महामार्गावर, काळकोंडी, झोपडपट्टी भागात खुलेआम वाहनात रॉकेल भरून दिले जाते. बसस्थानकाजवळील एरिगेशन गेटजवळ तर अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनांसाठीचा रॉकेल भरण्याचा अड्डाच झाला होता. एवढ्यात रोजरोस चालणाऱ्या प्रकाराकडे आजवर वसमत पोलिसांचे लक्ष गेले नव्हते. आज सकाळी एरिगेशन गेटजवळ एका टपरीत निळे रॉकेल विक्रीसाठी आल्याची खबर वसमत येथे नव्याने रूजू झालेले सपोनि हनुमंत रेजीतवाड यांना मिळाली. त्यांनी सकाळी ९.३० वाजता छापा मारला असता पत्र्याच्या टपरीत ७ कॅनमध्ये २६० लिटर रॉकेल आढळले. पोलिस पाहताच रॉकेल विक्री व्यवसाय करणारा आरोपी फरार झाला. पोलिसांनी निळे रॉकेल ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी सपोनि हनुमंत रेजीतवाड यांच्या तक्रारीवरून अब्दुल मुखीद अ. वहीद (रा.वसमत) याच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा तपास पोनि ताटे करीत आहेत. या छाप्यात २६० लिटर रॉकेलसह ६ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी मात्र फरार झाल्याचे रेजीतवाड यांनी सांगितले.(वार्ताहर)वसमत येथील अवैध रॉकेल विक्री केंद्रावर पोलिसांनी छापा मारला व साठा जप्त केल्याने शहरात सर्रास व राष्ट्रीय महामार्गावर खुलेआम अवैध रॉकेल विक्री होते, हा प्रकार सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट झाला आहे. आजवर या प्रकाराविरोधात एकदाही कारवाई होऊ शकली नाही. या व्यवसायास कोणाचे पाठबळ आहे. संबंधित बीट जमादार, गस्ती पथक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाण्यातील पोलिस अधिकारी, त्यांचे चाणाक्ष, ‘मुन्सी’ यांनाही हा प्रकार कसा दिसला नाही? हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. सर्वांत धक्कादायक बाब अशी की, ज्या ठिकाणी हा व्यवसाय चालत होता व पोलिसांनी छापा मारला त्यांच्या मागच्या भागातच ग्रामीण पोलिस ठाणे आहे, हे विशेष.
अवैध रॉकेल विक्री केंद्रावर छापा
By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST