हिंगोली : जिल्ह्याचे शिवसेनेचे नूतन संपर्कप्रमुख खा. विनायक राऊत यांच्या दौऱ्यातही शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने निष्ठावान शिवसैनिक हैराण झाले आहेत. जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत गटबाजी सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा पराभव झाल्यानंतर गटबाजीतील तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे वारंवार दिसून येत आहे. या गटबाजीतूनच शिवसेनेचे दोन संपर्कप्रमुख यापूर्वी बदलण्यात आले. त्यामध्ये बबनराव थोरात हे माजी आ. गजाननराव घुगे व डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्याजवळचे असल्याचे कारण सांगून त्यांना बदलण्यात आले. त्यानंतर नियुक्त करण्यात आलेले सुहास सामंत हे माजी खा. सुभाष वानखेडे व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या जवळचे असल्याच्या कारणावरून त्यांना बदलण्यात आले. काही दिवसांपूर्वीच सामंत यांच्या जागी शिवसेनेचे सचिव खा. विनायक राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नुकतेच खा. राऊत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात पुन्हा शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला. राऊत यांच्या समोरच एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. राऊत यांच्या नर्सी फाटा येथील स्वागतापासून सुरू झालेला गटबाजीचा वाद हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत तीव्र झाला. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम केलेल्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे राऊतही काही वेळ गोंधळले होते. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील गटबाजी कमी होणार की वाढणार? अशीच चर्चा होताना दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील वाद पुन्हा उफाळून आल्याने निष्ठावान शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)हिंगोली विधानसभेची शिवसेनेकडून मागणी औरंगाबाद येथे बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत हिंगोली विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि. प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, तालुकाप्रमुख कडूजी भवर, रामेश्वर शिंदे, अशोक नाईक आदींनी केली. मतदारसंघातील एकाही जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाचे उमेदवार निवडून आले नसल्याने या जागेवर शिवसेनेचाच दावा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीतही सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर
By admin | Updated: July 24, 2014 00:30 IST