नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे समाधी सोहळ्यानिमित्ताने भरणाऱ्या परतवारीच्या संदर्भाने संत नामदेव मंदिर संस्थान व पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने दर्शनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.नर्सी नामदेव हे गाव संत नामदेव महाराजांच्या जन्माने पवित्र झाले आहे. आषाढीला भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी जातात. पंढरपूरहून परत आल्यानंतर संत नामदेव महाराजांच्या दर्शनाशिवाय वारी पुर्ण होत नाही, अशी भाविकांची भावना आहे. २२ जुलै रोजी नर्सी येथे भरणारी यात्रा परतवारीची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुख-सुविधेसाठी व त्यांच्या संरक्षणासाठी संत नामदेव मंदीर संस्थान व पोलिस प्रशासनाच्या वतीने यंदा जय्यत तयारी करण्यात आली आहे.बंदोबस्तासाठी पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी ३, पोलिस निरीक्षक ७, सहाय्यक पोलिस निरीक्षक ६, फौजदार १३, कर्मचारी २३७, महिला कर्मचारी ३४, रिझर्व पोलिस ६०, जलद कारवाई करणारे ६० जवान, बिनतारी यंत्रणा, वाहतुक शाखेचे अधिकारी, कर्मचारी असे ३०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मंदिर संस्थानच्या वतीने स्वयंसेवकांची तयारी झाली असून याची रंगीत तालीम २१ जुलैला सकाळी ९ वाजता नामदेव संस्थान परिसरात होणार असल्याचे नर्सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी सांगितले.नर्सी संस्थानच्या वतीने लाकडी बॅरिकेटस् बांधून सर्वांना दर्शन सुलभ कसे करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी संस्थानच्या वतीने तयार करण्यात आलेला उड्डाणपूल योग्य नसल्याने त्याचा वापर करता येणार नाही, असेही समजले.दिवसभर वीजपुरवठा राहणारमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता जी.के. रणवीर यांच्याशी संपर्क साधला असता, नामदेव मंदिराजवळील वीज पुरवठा सुरळीत राहील व त्यासाठी आमचे कर्मचारी त्या ठिकाणी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दर्शनबारीची असुविधासंत नामदेव महाराजांचे दर्शन व्यवस्थित होईल, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून लाखो रुपये खर्च करून दर्शनबारी रस्ता तयार करण्यात आला आहे. दर्शनासाठी भाविकांना रांगेतून जाताना येणाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही, जास्त पाऊस पडल्यास वयस्करांना याचा त्रास होणार आहे.भाविकांनी सहकार्य करावेसंत नामदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी व्यवस्थित रांगेमधूनच जावे व कुठलीही घाईगडबड करू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिस हे आपले मित्रच आहे. सहकार्य करून समाधानाने सोहळ्याचा आनंद अनुभवा, असे आवाहन सपोनि अशोक जाधव यांनी केले आहे.चिखलाचा रस्तानर्सी येथे संत नामदेव मंदिराकडे जाताना बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना नामदेव पाटीपासून जावे लागते. पाटी ते मंदिर या रस्त्यावर खड्डे झाले आहेत. त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. (वार्ताहर)
परतवारी उत्सवाची जय्यत तयारी; चोख पोलिस बंदोबस्त राहणार
By admin | Updated: July 21, 2014 00:26 IST