मानवत : तालुक्यात ६ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने वीज वितरण कंपनीच्या खांबांचे व ताराचे प्रचंड नुकसान झाले आणि वीजही गूल झाली. नुकसान झाल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी घटनास्थळाचे पंचनामे करून नुकसानीचा अंदाज घेतला आणि त्यानुसार कामास प्रारंभ केला. तीन दिवसांच्या परिश्रमानंतर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावातील वीज सुरळीत करण्यात यश आले. परंतु शेतातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास अजूनही त्यांच्या पुढे आव्हान आहे. ६ जूनच्या वादळी वाऱ्यात कोल्हा, राजूरा, नरळद, सोमठाणा, टाकळी निलवर्ण, शेवडी, पार्डी, ताडबोरगाव, पाळोदी आदी गावांतील व शेतातील सुमारे १३० विद्युत खांब मोडून पडले. यामध्ये मुख्य लाईनचे ५० सिमेंट पोल पडले. यापैकी १२ पोलचे काम पूर्ण करण्यात वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एम.ए. पवार, ए.व्ही. कव्हळे, लाईमन पी.एस. शिवणकर, ए.एम. कुसबागे व मजूर परिश्रम घेत आहेत. कनिष्ठ अभियंत्यांनी सोमठाणा व आटोळा येथील मुख्य लाईनचे काम करून पाणीपुरवठ्याची वीज सुरळीत केली आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीने वीज वितरणची दमछाक होत आहे. त्यातच कर्मचारी कमी असल्याने अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांमध्ये नाराजीगतवर्षी झालेला चांगले पर्जन्यमान, सतत पडत राहिलेला पाऊस यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली नाही. परिणामी शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असल्याने ठिबक सिंचन आणि सिंचनाद्वारे कापसाच्या लागवडी केल्या. परंतु अजून पाऊस न पडल्याने आणि वीज पुरवठा सुरळीत नसल्याने लागवड केलेले बियाणे वाया जाते की, काय? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊन त्यांची वीज वितरण कंपनीविषयी अगतिकता वाढत आहे. याचा परिणाम प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होतो. याबाबीची दखल घेऊन वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मानवतसाठी जास्तीचा कर्मचारी व मजूरवर्र्ग पुरविल्यास झालेल्या नुकसानीची कामे युद्ध पातळीवर होऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोशाला बळी पडावे लागेल.
वीज वितरण कंपनीची दमछाक
By admin | Updated: June 15, 2014 00:33 IST