औरंगाबाद : संशोधनासाठी आॅनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा विद्यापीठ सूत्रांनी व्यक्त केली असून, त्याकडे ‘पेट-१’ व ‘पेट-२’ उत्तीर्णांचे लक्ष लागले आहे. झाले असे की, उद्या २६ डिसेंबर ही ‘पीएच.डी.’ करण्यासाठी आॅनलाईन नोंदणीची अखेरची मुदत आहे. दुसरीकडे रत्नागिरी येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ‘पेट-१’ आणि ‘पेट-२’ उत्तीर्णांनाही संशोधनासाठी कायमस्वरूपी पात्र ठरविण्यात आले आहे. दरम्यान, २५ डिसेंबर रोजी सुटीचा दिवस असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला यासंबंधी निर्णय घेण्यास पुरेसा अवधी मिळाला नाही. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयाधीन राहून उद्या ‘बीसीयूडी’ कार्यालयामार्फत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे आॅनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ मागण्याची दाट शक्यता आहे.पेट व नेट उत्तीर्ण, कार्यरत प्राध्यापकांकरिता संशोधन करण्यासाठी विद्यापीठाने आॅनलाईन नोंदणी सुरू केलेली आहे. संबंधितांना उद्यापर्यंत संशोधन पत्रिका अर्थात ‘सिनॉप्सीस’ आॅनलाईन अपलोड करावा लागणार असून, ३१ डिसेंबरपर्यंत ‘हार्ड कॉपी’ जमा करावी लागणार आहे. विद्यापीठाने आता ‘एकदा पेट उत्तीर्ण झाला की तो विद्यार्थी संशोधनासाठी कायमस्वरूपी पात्र’ हे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार ‘पेट-३’ उत्तीर्णांची संख्या जवळपास साडेतीन हजार असून, पेट-१ व पेट-२ उत्तीर्णांची संख्याही दोन-तीन हजारांपर्यंत आहे. नेट उत्तीर्ण व कार्यरत प्राध्यापक जे संशोधन करू इच्छितात, त्यांची संख्या वेगळीच आहे. दुसरीकडे संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत गाईडची संख्या अपुरी आहे. याचा ताळमेळ लावण्यासाठी विद्यापीठाने संशोधनासाठी ‘मेरिट’चे मापक अवलंबले आहे. असे असले तरी एकूणच या गोंधळाच्या परिस्थितीत संशोधन प्रक्रियेचा बोजवारा उडण्याचे चित्र दिसत आहे.
संशोधन प्रक्रियेसाठी मुदतवाढीची शक्यता
By admin | Updated: December 26, 2014 00:16 IST