आशपाक पठाण , लातूरपाणीटंचाईच्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या विशेष सभेत पाणीप्रश्नावर चर्चा होण्याऐवजी जवळपास एक तास सदस्यांनी नको त्या विषयावर गोंधळ घातला़ परिणामी, संतप्त झालेल्या सत्ताधारीच महिला सदस्यांनी सभागृहातून काढता पाय घेतल्यावर महापौरांनी पंधरा मिनिटांसाठी सभा तहकूब केली़ अन् सभागृह शांत झाले़ ६ लाख लातूरकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर होणाऱ्या सभेत गांभीर्य बाळगायला हवे, ही बाब लक्षात आल्यावर तब्बल एक तासानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले़महापौर अख्तर शेख यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती़ लातूरकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पानेही तळ गाठल्याने दोन महिन्यांत शहरवासियांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार आहे़ अत्यंत गंभीर विषय बनलेल्या पाणीप्रश्नावर सदस्यांनी आपली मते मांडावीत, असे आवाहन महापौर अख्तर शेख यांनी सभेच्या प्रारंभीच केले़ परंतू, त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत काही सदस्यांनी विषय सोडून गोंधळ सुरू केला़ काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांत कुरघोडी सुरू असताना त्यात रिपाइंच्या गटनेत्यांनी भर घातली़ विशेष सभेसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या नगरसचिवांची नियुक्ती कायद्यानुसार योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करून दीपक सूळ यांनी आयुक्तांना धारेवर धरले़ तसेच आयुक्त आणि महापौरांचे जमत नसल्याने पाणीपुरवठ्याचे अनेक प्रस्ताव रखडल्याचा आरोपही त्यांनी केला़ माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे आकृतीबंधाच्या विषय मांडला़ याचवेळी राष्ट्रवादीचे गटनेते मकरंद सावे यांनी माईक हातात घेऊन पाणीप्रश्नावर बोला, असे म्हणताच वाद सुरू झाला़ पाण्याच्या खाजगीकरणात काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी दलाली केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या राजा मणियार यांनी करताच गोंधळात भर पडली़ रिपाइचे गटनेते चंद्रकांत चिकटे, शिवसेनेचे गटनेते सुनिल बसपुरे यांनी याप्रकरणी खुलासा करा, त्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली़ गटनेत्यावर झालेल्या आरोपाचे खंडन करण्यासाठी काँग्रेस सदस्यांनी राजा मणियार यांनी माफी मागावी, अशी मागणी केली़ आपण केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगत मणियार यांनी काँग्रेस सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले़ महापौर अख्तर शेख वारंवार शांत बसण्याचे आवाहन करीत असतानाही गोंधळ कमी होत नसल्याने अखेर महापौरांना १५ मिनिटांसाठी सभा तहकूब करावी लागली़ रात्री उशिरापर्यंत सभा सुरूच होती़सभागृहात ५० टक्के महिला सदस्य असतानाही सभांमध्ये पुरूषांची मक्तेदारी चालते़ नेहमीप्रमाणे पुरूषांचा गोंधळ पाहून संतप्त झालेल्या माजी महापौर प्रा़ स्मिता खानापुरे, डॉ़ रूपाली सोळुंके यांनी जोपर्यंत सभागृह सुरळीत चालणार नाही, तोपर्यंत आम्ही बाहेर जात असल्याचे सांगत काँग्रेसच्या सर्वच महिला सदस्य सभागृहाबाहेर पडल्या़ सभागृहात आम्हाला बोलू दिले जात नसल्याचा आरोप महिला सदस्यांनी केली़ राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महिला सदस्य सभागृहात बसून होत्या़ महिला बाहेर जात असल्याने महापौरांनी सभा तहकूब केली़
पाणी प्रश्नावर सभागृहात पोरखेळ !
By admin | Updated: January 5, 2016 00:13 IST