बीड : मागील चार दिवसांपासून बीड तालुक्यात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. या पावसात बीड तालुक्यातील घोडका राजुरीच्या मुख्य तलावाची भिंत खचली असून, यामुळे जवळपास पाच गावांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी या ठिकाणी सोमवारपासून तळ ठोकून आहेत.तीन महिन्यानंतर पावसाने आपले आगमन केले. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मागील तीन-चार दिवसांपासून बीड तालुक्यासह जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्या, तलाव काही प्रमाणात भरले आहेत. याच पावसामुळे बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथील मुख्य तलावाच्या असणाऱ्या संरक्षक भिंतीला मध्यभागीच भलेमोठे भगदाड पडले आहे. ही भिंत १९७२ साली बांधण्यात आली असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वी असा प्रकार घडला नसल्याचेही त्यांनी सांगितले. तलावाखालून राजुरीच्या शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती आहे. तसेच घोडका राजुरी, दहिफळ, पारगाव, पिंप्री, उमरी, ब्रह्मनाथवस्ती आदी गावांना या तलावापासून धोका आहे. सोमवारी सायंकाळच्या दरम्यान हा खड्डा पडला असावा, असा अंदाज येथील ग्रामस्थांनी वर्तविला. या तलावात काठोडा व मोची पिंपळगाव येथून येणाऱ्या दोन नद्यांचे पाणी येते. या तलावाची भिंत लवकर दुरुस्त न झाल्यास जीवित व वित्त हानी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पाटबंधारे विभागाच्या कानावर ही गोष्ट येताच कनिष्ठ अभियंता एस.बी. मोराळे यांच्यासह कर्मचारी तलावाच्या ठिकाणी दाखल झाले होते. मंगळवारी हा खड्डा बुजविण्यासाठी त्यांच्या विभागाकडून प्रयत्न सुरू होते.खड्डा बुजवून भिंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)
तलावाची भिंत खचल्याने धोका !
By admin | Updated: September 3, 2014 01:11 IST