उस्मानाबाद : यंदा दर्शपिठोरी अमावस्या बुधवारी दुपारी सुरू होऊन गुरूवारी संपणार आहे. त्यामुळे पोळा सण नेमका कधी साजरा करायचा, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रमावस्था असून, तुळजापूर, लोहारा तालुक्यासह इतरही काही गावात बुधवारीच हा सण साजरा करण्यात आला. इतर ठिकाणी गुरूवारी हा सण साजरा करण्यात येणार आहे. अमावस्यानंतर श्रावण मास समाप्त होतो. त्याच दिवशी बैल पोळा साजरा करण्याची प्रथा आहे. तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी), पिंपळा (खुर्द), गोंधळवाडी, सावरगाव, सुरतगाव, पांगरधरवाडी, तामलवाडी येथे बुधवारी साजरा केला. तर काटी गावात निम्या शेतकऱ्यांनी गुरुवारी साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्त सायंकाळी ६ वाजता बैलाचा शुभविवाह लावण्यात आला. तत्पूर्वी सकाळी बैलासह अन्य जनावरांना धुवून रंगरंगोटी करून सजविण्यात आले होते. यानंतर बैलांची गावभर मिरवणूक काढण्यात आली. विवाहानंतर पुरण पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. दरम्यान, दाते पंचागानुसार गुरूवारच्या सुर्योदयापासून अमावस्या लागू असली तरी बुधवारी दुपारी अमावस्याला प्रारंभ होतो तो गुरुवारी दुपारपर्यंत आहे. त्यामुळे दिवसभर विवाह लावायला हरकत नाही, असे ज्योतिष्यकार मोहन जोशी यांनी सांगितले.माकणीत दवंडीद्वारे माहितीलोहारा तालुक्यातील माकणी येथे बुधवारीच पोळा सण साजरा करण्याबाबतची माहिती दवंडीद्वारे देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी परंपरेप्रमाणे हा सण साजरा करण्यात आला. गावचे पोलिस पाटील विजय दुधाजी पाटील यांच्या हस्ते वेशीवर तोरण तोडण्यात आले. यानंतर पाटलाचे बैल वेशीतून तोरण तोडून गेल्यानंतर इतर शेतकऱ्यांचे बैल वेशीतून मारूती मंदिराकडे पुजेसाठी नेण्यात आले. मिरवणुकीवेळी ‘हरहर महादेव, सिध्देश्वर महाराज की जय’ असा जयघोष करण्यात येत होता.
जिल्ह्यात दोन दिवस पोळा
By admin | Updated: September 1, 2016 01:10 IST