नांदेड : जिल्ह्यातील २६ वैद्यकीय अधिकारी व १०७ कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा निर्णयावर राजकीय दबाव आणत या प्रतिनियुक्ती जैसे थे ठेवण्याचे प्रयत्न जि़ प़ त होत असल्याचे दिसत आहे़ त्याचवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़ एम़ शिंदे यांनी मात्र असा कोणताही दबाव नसल्याचे सांगत प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १०७ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश रद्द करताना या अधिकारी कर्मचाऱ्यांना तत्काळ मूळ जागेवर रूजू होण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिंदे यांनी दिले होते़ ७ आॅगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचारी रूजू न होता राजकीय दबाव आणून प्रतिनियुक्तीवरच काम करू द्यावे या प्रयत्नात आहेत़ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही रिक्त असलेल्या जागी आरोग्य अधिकारी, कर्मचारी नसेल तर रूग्णांचे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला़ मात्र यामागचा मुख्य उद्देश हा प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी हलवू नये हाच असल्याचे सांगितले जात आहे़ यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट करत कोणत्याही परिस्थितीत प्रतिनियुक्तीवर कर्मचारी ठेवले जाणार नसल्याचे सांगितले़ याबाबत आरोग्य उपसंचालकांनाही कळविण्यात आले असून असा कोणता निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी परवानगी आवश्यक आहे़ (प्रतिनिधी)
राजकीय दबाव
By admin | Updated: August 12, 2014 01:59 IST