निलंगा : कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा स्फोट होईल या भीतीने घटनास्थळावरील सरकारी यंत्रणेसह नागरिक मिळेल त्या वाटेने पळ काढत होते. मात्र भंगारच्या दुकानात थांबलेल्या २८ वर्षांच्या इरफान शेखने मोठ्या धाडसाने ‘माझा राजा हेलिकॉप्टरमध्ये अडकला,’ अशी आरोळी ठोकत मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी धाव घेतली अन् मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरमधून सुखरूप बाहेर काढले.घटनास्थळी उपस्थित असलेले लोक वाट मिळेल तिकडे पळत होते. घटना एवढी भयानक होती की, लोक सैरभैर झाले होते. भीतीचे वातावरण पसरल्याने प्रशासनही काही क्षण भांबावून गेले होते. पण धाडस दाखवून इरफान मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून गेला. ‘हमारा राजा अंदर अटका है’ म्हणत हेलिकॉप्टर जवळ जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आतून मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला, तेव्हा इरफानने बाहेरून दरवाजा ओढून काढला. मुख्यमंत्र्यांचा हात धरून त्यांना बाहेर घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इरफानला म्हणाले, ‘मी फिट आहे, ओके आहे, पायलट व इतरांना बाहेर काढा.’ त्यानंतर ते डीपीच्या बाजूला जाऊन थांबले. एवढ्यात प्रशासनातील अनेक अधिकारी धावून मुख्यमंत्र्यांजवळ आले. यावेळी अॅम्ब्युलन्स व अग्निशमन दलाचे बंबही घटनास्थळी दाखल झाले आणि अॅम्ब्युलन्समधून मुख्यमंत्री पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या घराकडे रवाना झाले. यावेळी इरफान म्हणाला, हेलिकॉप्टरमधून आमचा राजा फडणवीस साहेब यांना बाहेर काढल्यावर आणि ते सुखरुप असल्याचे पाहून मला मोठा आनंद झाला. स्वत:च्या भंगारच्या दुकानात हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडेच पाहत थांबलो होतो. काही कळायच्या आतच हेलिकॉप्टर कोसळले. स्फोट होईल या भीतीने लोक सैरावैरा पळाले असले, तरी माझ्या मनात ती शंका आली नाही. उलट माझ्या मनात हेलिकॉप्टरमधील मुख्यमंत्री साहेब आणि अन्य अधिकाऱ्यांना कसे बाहेर काढता येईल, हाच विचार क्षणार्धात आला आणि मी हेलिकॉप्टरकडे धावत गेलो. मुख्यमंत्र्यांनी आतूनच मी ओके असल्याचा इशारा केला. त्यामुळे तत्काळ त्यांना बाहेर काढण्यासाठी बळ मिळाले असल्याचे इरफान ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला. दरम्यान, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून बाहेर आल्यानंतर सरकारी यंत्रणेचा ताफा आणि गराडाच जमला. बघ्यांचीही गर्दी झाली. हेलिकॉप्टरचा स्फोट होईल, या भीतीने पळालेले पोलीसही मुख्यमंत्र्यांच्या बाजूने थांबले. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी गेला असावा, असेही इरफानने व उपस्थित सरकारी यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस पळाले, पण इरफान मुख्यमंत्र्यांसाठी धावला !
By admin | Updated: May 26, 2017 00:31 IST