औरंगाबाद : शहराची जडणघडण, घटना घडामोडींची मूक साक्षीदार असलेली पोलीस आयुक्तालयाची निजामकालीन इमारत धाराशायी करण्यात येत आहे. ही इमारत पाडून तेथे पोलीस आयुक्तालयाची तीन मजली टोलेजंग व अत्याधुनिक इमारत उभी राहणार आहे. नवीन इमारतीचे बांधकाम तीन टप्प्यांत वर्षभरात पूर्ण केले जाणार असून पोलीस आयुक्त कार्यालय आणि परिसराचा कायापालट होणार आहे.१९९१ मध्ये औरंगाबाद शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्त कार्यालय प्राप्त झाले. तत्पूर्वी औरंगाबाद ग्रामीण आणि शहराचा कारभार पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच बघितला जात. पोलीस अधीक्षक कार्यालय हे सध्याचे पोलीस आयुक्त कार्यालय असलेल्या इमारतीत होते. शहराला आयुक्तालयाचा दर्जा मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय टी.व्ही. सेंटर परिसरात सुरू झाले. शहराच्या वाढत्या विस्तारासोबत लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन येथे कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यांच्यासह शहरात तीन पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त कार्यरत आहेत. शिवाय शहरातील पोलीस ठाण्यांची संख्या १६ झाली आहे. तसेच डीएमआयसीमुळे आणखी दोन पोलीस ठाण्यांची यात भर पडणार आहे.ऐतिहासिक महत्त्व असलेले औरंगाबाद हे विभागीय शहर आहे. यामुळे येथे व्हीआयपींची सतत ये-जा असते. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण म्हणून या शहराची ओळख आहे. या शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढत आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाची निजामकालीन इमारत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्यासाठी अपूर्ण पडते. तसेच आगामी २० वर्षांच्या कालावधीत शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अधिकाऱ्यांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन आयुक्तालयाची नवीन इमारत उभारण्यात येत आहे.
पोलीस आयुक्तालय होणार तीन मजली
By admin | Updated: October 18, 2016 00:32 IST