लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाने १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात ४ कोटी वृक्षलागवड करण्याचा महावनमहोत्सव हाती घेतला. याअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दहा लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. वन विभागासह इतर शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जिल्ह्यात दीड लाख वृक्षांची जास्त लागवड करून शासनाच्या या महावनमहोत्सवास हातभार लावला आहे.जागतिक तापमानवाढीचा धोका लक्षात घेता राज्य शासनाने दोन वर्षात वृक्षलागवडीची धडक मोहीमच हाती घेतली आहे. गेल्या वर्षी २ कोटी यावर्षी ४ कोटी आणि २०१९ मध्ये राज्यात ३३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे शासनाने उद्दिष्ट आहे.यात वन विभागाचा पुढाकार आहे. यंदा जिल्ह्याला साडेआठ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामुळे वन विभागाने लोकसहभागाचा आधार घेत जिल्ह्यातील २५ रोपवाटिकांच्या माध्यमातून साडेआठ लाखांचा लक्ष्यांक ओलांडून दहा लाख वृक्षांची लागवड केली.यामध्ये कृषी विभागाने १ लाख ५२ हजार १७३, ग्रामपंचायत २ लाख ९५ हजार, वन विभाग १ लाख ५० हजार, स्वयंसेवी संस्था ५८ हजार, सार्वजनिक बांधकाम विभाग ६ हजार, को-आॅपरेटिव्ह सोसायटी २५ हजार, उच्च शिक्षण विभाग १००० हजार, महावितरण २ हजार, न्यायालय १२५, एमआयडीसी ६ हजार, पोलीस प्रशासन ६ हजार, नगरपालिका १२ हजार, सामाजिक न्याय विभाग ३ हजार, लघुपाटबंधारे विभाग ३ हजार, महसूल विभाग ६ हजार, जलसंपदा विभाग ३ हजार अशा १० लक्ष रोपांची लागवड करण्यात आली आहे. तर काही नागरिकांनी सुध्दा वन विभागाच्या शासकीय रोपवाटिकेतून रोपे नेऊन लागवड केल्याचे वन परिक्षेत्राधिकारी मदन निकुंभ म्हणाले.या लाखो रोपांची योग्य देखभाल पुढे केली जाईल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.
दहा लाख वृक्ष लागवड; उद्दिष्टापेक्षा तब्बल दीड लाखाने पुढे
By admin | Updated: July 13, 2017 00:49 IST