हिंगोली : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या आराखड्याला यापूर्वीच्याच जलव्यवस्थापन समितीत मान्यता दिली असली तरी गावनिवडीच्या प्रक्रियेला मात्र सदस्यांच्या विरोधामुळे ब्रेक लागला आहे. अनेक सदस्य याबाबतचे गाऱ्हाणे करीत असल्याचे पहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत लघुसिंचन विभागाला वार्षिक योजनेत मिळालेल्या निधीतून घ्यावयाच्या कामांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. मात्र ही कामे कोणत्या गावात घ्यायची यावरून वादंग सुरू आहे. जो-तो आपापल्या भागातील कामे पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. या योजनेत उपलब्ध असलेल्या निधीच्या दीडपट याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वसाधारणमध्ये २.६0 कोटी तर आदिवासी उपयोजनेत १.३0 कोटी रुपयांचे नियोजन करायचे आहे. यामध्ये सिमेंट बंधाऱ्यांच्या एकूण २१ कामांचे नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरासरी १३ लाखांचा एक बंधारा याप्रमाणे साईटच्या गरजेनुसार कमी-अधिक किमतीची अंदाजपत्रके होणार आहेत. त्यात सर्वसाधारणचे बंधारे १३ तर आदिवासी उपययोजनेतील ८ बंधाऱ्यांचा समावेश राहणार आहे. लपाच्या कामांमध्ये तीन पाझर तलावांची कामे आहेत. ४५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त निधीची ही कामे होणार आहेत. यात सर्वसाधारणमधून दोन तर आदिवासी उपययोजनेत एक काम घेता येणार आहे. विविध विभागांचे नियोजन मार्गी लागत असताना या विभागाला मात्र प्रतीक्षेची वेळ आली आहे. विशेष म्हणजे जि.प.अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली याचे नियोजन सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
लघुसिंचनचे नियोजनच होईना
By admin | Updated: December 16, 2015 23:16 IST