राजकुमार जोंधळे , लातूरअहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी भविष्यात जागतिक किर्तीचा चित्रकार होईल हे त्यावेळच्या शिक्षकांनाही वाटले नसेल...मात्र आज मुंबईच्या कलाविश्वातून त्याने जागतिक कलाविश्वात यशस्वी प्रवेश केला आहे. लंडनच्या जागतिक किर्तीच्या कलादालनात त्याच्या चित्रांचे प्रदर्शन होते, हेच लातूर जिल्ह्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. चित्रकलेतही ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करणाऱ्या कांही मोजक्या कलावंतात उत्तम चापटे यांचे नाव आघाडीवर आहे.मुंबईच्या कलाविश्वातील एक अग्रगण्य कलावंत, उत्तम एकनाथराव चापटे यांंच्या कलाकृतींचे प्रदर्शन नुकतेच लंडन येथील ‘कॉमडेन इमेज आर्ट गॅलरीत’ झाले. लंडनच्या या जगप्रसिध्द आर्ट गॅलरीने भारतातील अग्रगण्य अशा २३ कलावंतांच्या कलाकृतींची खास निवड करुन ‘ब्लँक मँगो’ या नावाने त्या प्रदर्शीत केल्या आहेत. हे प्रदर्शन आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात झाले. अशा विश्वस्तरीय प्रदर्शनात उत्तम चापटे या लातूरच्या कलावंताच्या कलाकृतींची निवड होण्याचा बहुमान त्यास मिळाला आहे. त्याच्या कलाकृती समकालीन भारतीय अमुर्त शैलीत साकारल्या आहेत. उत्तम चापटे यांचे जानेवारी महिन्यात एक प्रदर्शन दिल्लीच्या ललीतकला अॅकादमीच्या कला दालनात झाले. या प्रदर्शनास कलारसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्या चित्रांची निवड करण्यात आली. ही त्यांची चारही चित्रे अमुर्त शैलीतील असून, मराठवाड्यातील भीषण आवर्षण, दुष्काळाची स्पंदने टिपण्याचा प्रयत्न करतात. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथील कलाविश्वात उत्तम चापटे हे नाव आता चांगलेच नावाजलेले आहे. १९९५ पासून ते या कलाविश्वात कार्यरत आहेत. नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या या लातूरच्या कलावंताने आपले ग्रामीण भागातील अस्तित्व आणि जाणिवा अत्यंत सजगपणे जोपासल्या आहेत. यापूर्वी पिडित स्त्रिया आणि बालकांचे आक्रोश ठळकपणे मांडणारी त्यांची चित्रे आता अमुर्त शैलीत साकारु लागली आहेत.गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात उद्भवलेल्या सततच्या नापिकीने हा संवेदनशील मनाचा चित्रकार व्यथित झाला नाही तरच नवलच... दुष्काळाच्या भयावह वास्तवाची स्पंदने त्यांच्या या अमुर्त शैलीतून प्रकट होताना दिसतात. यापूर्वीही त्यांची प्रदर्शने मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत १९९६ पासून सतत भरविली गेली आहेत. दिल्लीच्या ललित कला अॅकादमीच्या आर्ट गॅलरीत त्यांचे आतापर्यंत पाचवेळा ‘सोलो शो’ झाले आहेत. तर मुंबई, चेन्नई, कोलकाता, गोवा आदीं प्रमुख शहरांतून अनेक समुह चित्र प्रदर्शनांतून त्यांच्या चित्रांचा सहभाग राहिला आहे.
हडोळती ते लंडन एक चित्रमय प्रवास
By admin | Updated: September 6, 2015 23:56 IST