कुरूंदा : औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा येथे स्मशानभूमीच्या रस्त्याच्या वादातून मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास अंत्यविधीसाठी घेऊन जाणारे प्रेत अडविले. यामुळे दोन गटात वाद निर्माण होऊन गावात तणाव पसरला होता. अखेर पोलिस व तहसील प्रशासनाने मध्यस्थी करून हा वाद तात्पुरत्या स्वरूपात मिटविला. उमरा येथे ५ एकर गायरान जमीन आहे. त्या पैकी ३३ गुंठे गायरान जमीन एका समाजाच्या स्मशानभूमीसाठी शासनाने दिलेली आहे. तशी शासन दप्तरी व साबारावर अधिकृत नोंद आहे. शिल्लक जमीन दुसऱ्या समाजाला गायरान म्हणून देण्यात आलेली आहे; परंतु स्मशानभूमीला जाण्यासाठी ठरलेला रस्ता नसल्याने गायरानमधून अंत्यविधीसाठी लोक जात असतात. १ जुलै रोजी उमरा येथील गिरजाबाई बोंगाणे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास गिरजाबाई बोंगाणे यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी घेऊन जात असताना गावातील एका गटाने हे प्रेत अडविले. यावरून वाद उद्भवला व किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर गावात दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला. पोलिस प्रशासनाला माहिती मिळताच औंढ्याचे तहसीलदार श्याम मदनूरकर, नायब तहसीलदार लांडगे, पोलिस निरीक्षक नानासाहेब नागदरे, जमादार गणेश मस्के, परसराम राठोड, गणेश पवार, भुजंग कोकरे, राठोड आदींनी भेट दिली. दोन्ही गटाचा वाद पोलिस वसाहतीत प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात मिटवून अंत्यविधी करून घेतले. आठ दिवसानंतर दोन्ही गटाची हद निश्चित करून रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन तहसील प्रशासनाने दिले. यावेळी गावात तणावपूर्ण शांतता होती. या प्रकरणी पोलिस ठाण्याच्या दफ्तरी घटनेची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
रस्त्याच्या वादातून प्रेत अडविले
By admin | Updated: July 2, 2014 00:32 IST