औरंगाबाद- पानेवाडी येथून पेट्रोलचे टँकर उशिरा शहरात येत असल्याने शनिवार, दि. १६ रोजी काही पंपांवरील टाक्या ड्राय झाल्या होत्या. परिणामी, जे पेट्रोलपंप सुरू आहेत तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.सोमवार, दि. ११ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्व पेट्रोलपंपचालकांनी एक दिवसाचा बंद पुकारला होता. यामुळे १० व १२ रोजी शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा शहरात पेट्रोलचा तुटवडा जाणवला. यासंदर्भात औरंगाबाद पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष चांदमल खिंवसरा यांनी सांगितले की, शुक्रवार, दि. १५ आॅगस्ट रोजी पानेवाडी येथील डेपो बंद होता. यामुळे आज डेपोसमोर टँकरची एकच गर्दी झाली. उशिरा टँकर येत असल्याने शहरात त्याचा परिणाम जाणवला. आमच्या पेट्रोलपंपावर दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत टँकर येत असते, आज सायंकाळी टँकर आल्याने वाहनधारकांची गर्दी झाली. रविवारी पानेवाडी येथील डेपो सुरू राहणार आहे; मात्र सोमवारी बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम आणखी दोन दिवस काही प्रमाणात शहरात जाणवेल.
शहरात पुन्हा एकदा पेट्रोलपंपांवर रांगा
By admin | Updated: August 17, 2014 01:43 IST